रत्नागिरी : सध्या नाताळची सुटी सुरू असल्यामुळे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. नववर्ष स्वागतासाठी पर्यटक कोकणात आले आहेत. कमी अंतराचा मार्ग म्हणून सागरी महामार्गावरील आरे-वारे मार्गाचा वापर अधिक होत आहे. मात्र, अरूंद रस्त्यामुळे शिरगाव येथे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे पर्यटक तासन्तास वाहतूक कोंडीत सापडल्याने हैराण होत आहेत.बहुतांश शाळांना नाताळची सुटी आहे. शिवाय डिसेंबर हा पर्यटनाचा हंगाम असल्यामुळे कोकणाला पर्यटकांची अधिक पसंती आहे. महाराष्ट्राबरोबर विविध राज्यातील तसेच परदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल झाले आहेत. अनेक पर्यटक दोन ते तीन दिवसांसाठी कोकणात येत असले तरी एका दिवसात परत फिरणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे.नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेल्या पर्यटकांमुळे समुद्रकिनारे सध्या फुल्ल आहेत. गणपतीपुळे, भाट्ये, आरे-वारे, मांडवी बीचवर पर्यटकांची गर्दी अधिक होत आहे. रत्नागिरीतील भाट्ये व मांडवी किनारे पर्यटकांमुळे सायंकाळी गर्दीने फुलून जात आहेत.
आरे-वारे व गणपतीपुळे बीच जवळ असल्यामुळे या बीचवरही गर्दी भरपूर होत आहे. आरे-वारे किनाºयावर विजेची तसेच अन्य कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सूर्यास्तानंतर लगेचच पर्यटक मंडळी काढता पाय घेत आहेत. गणपतीपुळे येथील गर्दीमुळे हॉटेल्स, लॉजिंग फुल्ल असल्याने आसपासच्या गावात पर्यटक निवास करीत आहेत.सागरी महामार्गाचा वापर प्रवासासाठी करीत असल्यामुळे शिरगाव येथील अरूंद रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. अरूंद रस्त्यामुळे दोन मोठी वाहने समोरासमोरून येत असली तर लहान वाहनांची मागे-पुढे गर्दी निर्माण होते. त्यातच दुचाकीस्वार गर्दीत घुसून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागत असून, वाहतूक कोंडी होत आहे.शिरगावातील जवानशहा दर्ग्यापासून रेशनदुकानापर्यंत वाहनांच्या दोन्ही बाजूने रांगा लागत आहेत. पर्यटकांच्या गाड्यांबरोबर याशिवाय सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने वºहाडाच्या गाड्या, मासळी वाहतूक, शैक्षणिक सहली, खासगी सहलींच्या गाड्या, आंबा फवारणी, चिरे वाहतूक तसेच एस. टी. अन्य लहान-मोठ्या गाड्यांनी रस्ता व्यापून जात आहे.
अनेक वेळा ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडवावी लागते. सध्या गर्दीमुळे वाहतूक पोलीस शिरगाव गावाच्या दोन्ही वेशीवर तैनात असून, वाहनांची गर्दी कमी करीत आहेत. टप्प्याटप्प्याने एक बाजू सुरू, तर एक बाजू बंद अशा प्रकारे नियोजनाव्दारे वाहतूक कोंडी सोडविण्यात येत असली तरी त्यासाठी तास ते दोन तास लागतात.