लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह एकंदरीत भटक्या श्वानांची दहशत मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. शहरातील सर्वच भागांत या मोकाट श्वानांचा मुक्त संचार वाढू लागला असून, नागरिकांच्या अंगावर धावून जात हल्ला करणे, दंश करणे आदी प्रकार वाढल्याने ज्येष्ठ नागरिक, मुले यांच्यासह नागरिकांनी या भटक्या श्वानांचा धसका घेतला आहे. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत ३,७७० नागरिकांना श्वानदंश झाला आहे.
भटक्या श्वानांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता नगरपालिका, ग्रामपंचायती या श्वानांचा बंदोबस्त करण्याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.
..........
आम्हाला चोरीची नाही, कुत्र्याची भीती वाटते
रत्नागिरी शहरात मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे. मध्यंतरी नगरपरिषदेने या श्वानांना पकडण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र, अजूनही संख्या कमी झालेली दिसत नाही. लहान मुलांच्या हातात पिशवी असेल तर हे श्वान ती ओढून घ्यायला पुढे येतात. रात्री चोरांपेक्षा या श्वानांचीच भीती मनात अधिक असते.
- मनीषा पवार, गवळीवाडा,रत्नागिरी
शहरातील भटक्या श्नानांच्या त्रासांनी त्रस्त व्हायला झाले आहे. अनेकांवर या श्वानांनी हल्ले केले आहेत. दिवसरात्र या श्वानांचा मुक्तसंचार सुरू असतो. अनेकदा नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, मुलांच्या मागे लागणे असे प्रकार सातत्याने घडू लागल्याने या श्वानांची दहशत नागरिकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.
- प्रकाश कांबळे, नाचणे, रत्नागिरी
..................................
श्वानांच्या नसबंदीचा प्रयत्न असफल
-शहरातील भटक्या श्वानांची संख्या भरमसाठ वाढली आहे.
- या श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचा प्रयत्न पालिकास्तरावर अपयशी ठरत आहे.
- श्वानांमधील हिंसकता धोकादायक
..............
पाळीव श्वानांपेक्षा भटक्या श्वानांकडून नागरिकांना दंश करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अँटी रेबिज इंजेक्शन उपलब्ध करून ठेवावी लागतात. त्यामुळे जिल्हा रुग्णालयालाही पुरेसा साठा ठेवावा लागतो.
- डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी
जिल्ह्यात श्वानदंशाची संख्या पाहता जिल्हा शासकीय रुग्णालयात एक हजार ॲंटी रेबिज इंजेक्शनची उपलब्धता करून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.