रत्नागिरी : बारसू रिफायनरी विरोधक ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पूत्र आणि माजी खासदार निलेश राणेंचा ताफा अडविला आहे. यामुळे रत्नागिरीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
नाणारमध्ये होणारी ऑईल रिफायनरी तिकडे विनाशकारी ठरते, मग आमच्या गावात ती चांगली कशी ठरते, असा सवाल आंदोलकांमधील महिलांनी केला. यावेळी नितेश राणे यांनी तुम्ही जागा ठरवा आपण साऱ्यांनी बसून बोलू असे सांगत विरोधकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. यावेळी निलेश राणे यांनी ग्रामस्थांना आम्हाला थांबवून सांगायचे होते, ते सांगितले आहे. आम्ही एकत्र बसून चर्चा करणार आहोत, ते ठिकाण सांगणार आहेत, असे म्हटले.
मृदा तपासणीसाठी आलेल्या सरकारी पथकालादेखील ग्रामस्थांनी काल अडविले होते. यानंतर आज निलेश राणेंना देखील अडविण्यात आले. यावेळी मी आहे, आपण बसून बोलू. चर्चा करू, असे विरोधकांना म्हणाले. हा राज्य आणि केंद्र सरकारने प्रकल्प आणला आहे. हा निलेश राणेचा प्रकल्प नाही. सरकारशी बोलावे लागेल. आता अधिवेशने सुरु आहेत. सरकारशी बोलून मार्ग काढू अशी भूमिका निलेश राणे यांनी मांडली. नारायण राणेंना गावात बोलवू आणि त्यांच्याशी चर्चा करू असे आश्वासन राणे यांनी दिले.
निलेश राणे इथे आले आहेत. त्यांच्या समोरच काम सुरु आहे. त्यांनी हे थांबवायला हवे होते, असे आंदोलक महिलांनी म्हटले. बारसू गावच्या महिलांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. जे काही बोलायचे आहे ते इथेच बोला आम्ही तुम्हाला गावी येऊ देणार नाही, असे या महिलांनी राणेंना ठणकावून सांगितले आहे. यानंतर मध्यस्थी करण्यात आली आणि निलेश राणेंना रस्ता मोकळा करून देण्यात आला.