चिपळूण : मुसळधार पाऊस, कोसळणाऱ्या दरडी, बंद झालेले विविध मार्ग, संपर्कात येणाऱ्या अडचणी या सगळ्या गोष्टींचा सामना करत केवळ चिपळूणवासीयांना मदत पोहोचविण्यासाठी भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे चिपळूण येथे दाखल झाले. सोबत आणलेली मदत त्यांनी संबंधितांकडे सुपुर्द केली तर त्यांनी परिस्थितीचा आढावाही घेतला.
मदतीच्या भावनेतून नीलेश राणे शुक्रवारी सकाळी मुंबईतून चिपळूणला आले. त्यांनी आपल्यासोबत आवश्यक ते समान भरून घेतले हाेते. चिपळूणला येणाऱ्या जवळपास सर्वच मार्गांवर अनेक अडचणी होत्या. काही ठिकाणी दरडी कोसळत होत्या, काही ठिकाणी पाणी भरले होते. रस्ते बंद होते. संपर्क तुटला होता. परंतु, याही परिस्थितीचा सामना करत नीलेश राणे चिपळूण येथे पोहोचले. त्यांनी चिपळूणच्या नागरिकांसाठी आणलेल्या जीवनावश्यक वस्तू संबंधितांकडे वाटपासाठी दिल्या.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडून त्यांनी चिपळूण पुराची आणि वस्तुस्थिती जाणून घेतली. तिथल्या चिपळूणवासीयांशीही चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.