रत्नागिरी : मागील काही घडामोडीमध्ये एकटा नीलेश राणे विरूद्ध अख्खी शिवसेना असे चित्र होते. मात्र, शिवसेना माझे काहीही करू शकले नाही. इतिहासामध्ये कधीही रत्नागिरीची शाखा चार दिवस बंद नव्हती, ती आपण बंद पाडली. आगामी लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना घरी पाठवणारच, अशी शपथ आपण घेतली आहे.
शिवरायासमोर आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे, काही झालं तरी शिवसेना नको, कोणीही चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार इथे टिकता कामा नये. जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करणारच, असे मत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी व्यक्त केले.दक्षिण रत्नागिरीतील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांच्याहस्ते शनिवारी रत्नागिरीत करण्यात आला.
यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. या कार्यक्रमाला दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मेघना शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन माजळकर, जिल्हा सरचिटणीस मुन्ना खामकर, प्रवक्ते नित्यानंद दळवी, शहर अध्यक्ष अशोक वाडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
उदय सामंत यांच्यावर हल्लाबोलशिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलयं की, बाईमाणसाची अब्रु म्हणजे आपल्या आईसारखी असते. ती कोणीही असली तरी आपल्या आई-बहीण समान असते. आणि तुमची रासलिला सुरू आहे. अस नाही सोडणार. प्रत्येक प्रकरण बाहेर काढणार. निलेश राणेकडे आयुष्यातील हे सहा महिने आहेत, या सहा महिन्यात या सर्वांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही. अब्रुनुकसानीचा दावा ठोक नीलेश राणेवर असा हल्लाबोल त्यांनी म्हाडा अध्यक्ष आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्यावर केला.