देव्हारे : मंडणगड तालुक्यातील देव्हारे येथील महावितरण कंपनीच्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांना व येथे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महावितरण कंपनीच्या ९ कर्मचाऱ्यांवर तब्बल ३५ गावांतील १००पेक्षा जास्त वाड्यांचा भार आहे. महावितरण कंपनीच्या देव्हारे कार्यालयात ३५ गावांपेक्षा जास्त गावे व १०० पेक्षा जास्त वाड्यांचा समावेश आहे. शंभरपेक्षा जास्त वाड्यांसाठी देव्हारे कार्यालयामध्ये फक्त नऊ कर्मचारी नियुक्त आहेत. त्यामुळे प्रत्येक वायरमनकडे अकरा ते बारा वाड्यांचा भार असतो. एखाद्या गावातील किंवा घरातील वीज गेल्यास त्या गाव किंवा वाडीला चार पाच दिवस अंधारामधे रहावे लागते़ देव्हारे कार्यालयाअंतर्गत तुळशी, निगडीपासून शेवरे, चिंचघरपर्यंतची गावे असून, या गावांतील मोठ्या लोकवस्तीच्या शंभरपेक्षा जास्त वाड्या आहेत़ मात्र, त्यांच्यासाठी देव्हारे कार्यालयामध्ये फक्त नऊ वायरमन असल्याने त्यांची मोठी परवड होत असते. या सर्व गावांमधे ५२ ट्रान्स्फार्मर असून वायरमन अपुरे आहेत. वास्तविक एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रासाठी कमीत कमी १५ वायरमन असणे आवश्यक होते़ सध्याची देव्हारे परिसराची परिस्थिती तर अगदी बिकट आहे. येथे कोन्हवली, देव्हारे, ताम्हाणे व अन्य काही गावांना तर वायरमन नसल्याने या गावातील वीजधारकांचे मोठे हाल होत आहेत. त्यांना घरी पावसाळ्यातही अंधारात रहावे लागत आहे़ देव्हारे गावामध्ये पाच वाड्यांचा समावेश आहे. येथे दोन वायरमन आवश्यक आहेत, मात्र सध्या या गावाला एकही वायरमन नियुक्त नाही. अपुरा कर्मचारी वर्ग याचा फटका येथील ग्राहकांना सहन करावा लागत आहे़ (वार्ताहर) अंधारात राहण्याची वेळ अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर विजेची देखभाल करताना येतायत नाकीनऊ अनेक गावे राहताहेत अंधारात. नऊ वायरमनच्या ताब्यात ३५पेक्षा जास्त गावं. घरातील वीज गेल्यास वाडीला चार पाच दिवस अंधारात रहावे लागते. अनेक वाड्या मोठ्या असल्याने वीज देखभाल करताना कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत. देव्हारेत एकही वायरमन नसल्याने गैरसोय
नऊ वायरमन अन् शंभर वाड्यांचा भार
By admin | Published: August 31, 2014 12:29 AM