शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ देत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेला पुन्हा नव्यानं उभारी देण्यासाठी नेते सज्ज झाले आहेत.
रत्नागिरीत आज शिवसेनेकडून निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली. शिवसेना संपवण्याचे भागीदार झाल्यास तुमची जागा नरकात असेल. तुमच्या जाण्याची आम्हाला किंमत नाही. यापुढे कोणत्याही गद्दाराला शिवसेनेमध्ये प्रवेश नाही, असं विनायक राऊत म्हणाले.
शिवसेनेचा बाण हिसकावून घेण्याची भाषा काही जण करत आहेत. मात्र शिवसेनेचा धनुष्य बाण हिसकावून घेणारी औलाद अजून जन्माला आली नाही आणि येणार नाही, असा निशाणा विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांवर साधला. तसेच यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विनायक राऊत यांनी कौतुक केले.
उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात राज्यात प्रभावी काम केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे पाहिल्या पाच मुत्र्यमंत्र्यांपैकी पहिल्या नंबरचे मुख्यमंत्री ठरले, असं विनायक राऊत यांनी सांगितलं. तसेच रत्नागिरीसह महाराष्ट्रमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सर्वाधिक आमदार आगामी काळात निवडून येतील, असा विश्वास देखील विनायक राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.