हातखंबा : गणेशोत्सव काळात अनेक सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाते. विसर्जनामुळे नदीचे प्रदूषण होऊ नये याकरिता निर्माल्य संकलनाचा उपक्रम हाती घेतला जाताे. याच अनुषंगाने लायन्स क्लब हातखंबा रॉयलतर्फे झरेवाडी येथे निर्माल्य संकलनाचा उपक्रम हाती घेण्यात आला हाेता.
गौरी-गणपती विसर्जनादिवशी निर्माल्य संकलन स्थळाची साफसफाई करण्यात आली. निर्माल्य संकलन करण्यासाठी लागणाऱ्या साधनांची उपलब्धता अवधूत कळंबटे यांनी केली. गौरी-गणपतींच्या विसर्जनावेळी गणेशभक्तांना निर्माल्य एकत्रित करण्याचे आवाहन क्लबतर्फे करण्यात आले. या आवाहनानुसार हार-फुले, पानांचे निर्माल्य तसेच प्लास्टिक कागद पेपर यांचे निर्माल्य असे वेगवेगळे संकलन करण्यात आले. ग्रामस्थ जयवंत कळंबटे यांनी खतनिर्मितीमधून निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासाठी खड्डेयुक्त उपलब्ध करून दिलेल्या जागेत हे निर्माल्य टाकण्यात आले. क्लबतर्फे राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक गावातील सर्वांनी केले असून, कायम स्वरूपी हा उपक्रम राबवावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. हा उपक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी अध्यक्ष मनोजकुमार खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली खजिनदार गिरीश शितप, अवधूत कळंबटे उपस्थित होते.