खेड : तालुक्यातील सुकिवली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या कारखान्यासाठी सरपंचांची बनावट सही व शिक्का मारून महावितरणकडून वीज जोडणी घेतल्याची तक्रार करून १२ दिवसांचा कालावधी लोटूनदेखील अद्याप कुठलीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सुकिवली-देऊळवाडीत प्रकाशकुमार नरसिंह पटेल यांच्या मालकीचा उमा वूड इंडस्ट्रीज नावाचा तीन वर्षांपासून कारखाना सुरू आहे. या कारखान्यास ग्रामस्थांचा ठाम विरोध असून, वीजपुरवठा करण्यासाठी हरकतही घेतली आहे. कारखान्यातील वीजपुरवठ्यासाठी ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारचा नाहरकत दाखला दिलेला नाही. मात्र, तरीही वीजपुरवठ्यासाठी संबंधित मालकाने ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवर सरपंचांची बनावट सही करून नाहरकत दाखला घेत वीजजोडणी घेतली आहे.
ही बाब गावातील जागरूक नागरिकांनी हाणून पाडत बनावट सहीचा प्रकार उघड केला. याबाबत सरपंच शीतल चाळके यांनी फसवणुकीची तक्रार करून १२ दिवस झाले तरी पोलीस स्थानकात कार्यवाही दाखल केली. मात्र, अजून कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करत संबंधित मालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता काही आक्षेपार्ह बाबी आढळल्या असून, तसा अहवालही सादर केला आहे.