लांजा : शिंदे गटात प्रवेश न केलेल्या लांजा नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षा पूर्वा मुळे यांना पदावरुन बाजूला करण्यासाठी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. अविश्वास ठरावाबाबत साेमवारी (१७ एप्रिल) झालेल्या विशेष सभेत १३ विरुद्ध ० असा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव मंजूर करत शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे.लांजा नगर पंचायतीत शिवसेनेची एक हाती सत्ता हाेती. शिवसेनेत फाटाफूट झाल्यानंतर नगरपंचायतीतील शिवसेनेचे पाच, अपक्ष २ सदस्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे पक्षाशी प्रामाणिक राहिल्या. त्यामुळे त्यांना पदावरून हटविण्यासाठी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. यासाठी १७ राेजी विशेष सभा घेण्यात आली. नगराध्यक्षांसह शहर विकास आघाडीतील १३ नगरसेवकांना गटनेता म्हणून पूर्वा मुळे यांनी व्हिप बजावला होता.
दरम्यान, या अविश्वास ठरावावेळी शिंदे गटाचे ५, काँग्रेसचे २, अपक्ष २ आणि भाजपच्या ३ नगरसेवकांसह नगराध्यक्षांनी मतदान केले. त्यामुळे हा अविश्वास ठराव १३ विरुद्ध ० मतांनी मंजूर झाला. तर अविश्वास ठराव मांडण्याआधी शिंदे गटासह १२ नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले होते. अविश्वास ठरावादरम्यान होणारी संभाव्य पळवापळवी, फाटाफूट या गोष्टी टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. हा ठराव मंजूर हाेताच शिंदे गटाच्या नगरसेवकांनी जल्लाेष केला.
आमदारांनाही धक्कापूर्वा मुळे यांच्याविरोधात मंजूर झालेला अविश्वास ठराव हा स्थानिक आमदार राजन साळवी यांनाही धक्का मानला जात आहे. आमदार राजन साळवी यांच्याकडे लांजाचे नेतृत्व आहे. राजन साळवी यांची तालुक्यावर मजबूत पकड आहे. मात्र, या अविश्वास ठरावामुळे त्यांना धक्का बसला आहे.
काँग्रेसची साथअविश्वास ठरावाच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर फाेडाफाेडीचे राजकारण पाहायला मिळाले. राज्यात महाविकास आघाडी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचे दिसले. स्थानिक पातळीवर काँग्रेसने शिंदे गटाला साथ देत ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्षा पूर्वा मुळे यांना बाजूला केले.