दापोली : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना दिली. परंतु, काही निर्बंध लावले जातील, असेही त्यांनी सांगितले.आरोग्यमंत्री राजेश टोपे खासगी दौऱ्यानिमित्ताने दापोलीत आले होते. रविवारी त्यांनी दापोलीतील रामराजे महाविद्यालय व दापोली अर्बन बँक येथे भेट दिली. रामराजे महाविद्यालयातील भेटीदरम्याने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार संजय कदम, रामराजे कॉलेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप राजपुरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर व बँकेचे संचालक मंडळ उपस्थित होते.यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यात कोरोनाच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतु, दिवाळीमध्ये रुग्ण तपासणीचे प्रमाण कमी झाल्याने रुग्ण संख्या कमी होती. आपण एका दिवसाला ९०,००० तपासणी करतो. दिवाळीत केवळ ३०,००० रुग्णांची तपासणी होत होती. त्यामुळे रुग्णांची संख्या कमी होती.
आता पुन्हा ९०,००० लोकांच्या तपासणी करण्यात येत असल्याने आता हा आकडा दिवसाला तीन हजार ते चार हजारावर गेल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात तपासणीचे प्रमाण वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांची तपासणी केली जाणार आहे. पुढील काही दिवसात संख्येत वाढ होईल, असेही टोपे यांनी सांगितले.दोन महिन्यात लस?कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काही अटी व शर्ती लागू करण्यात येतील. नियम अधिक कडक करण्यात येतील. लोक सोशल डिस्टन्स विसरले असून, अनेकजण मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो, लस येईपर्यंत सगळ्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनावरील लस पुढील दोन महिन्यात येऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.