खेड : निसर्ग चक्रीवादळामुळे काेकणात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़ मात्र, गेल्यावर्षीची काहीच मदत अजून मिळालेली नाही़ हे सरकार आत्मविश्वासी नव्हे तर आत्मघातकी सरकार आहे़ काहीही झाले की केंद्राकडे बाेट दाखवायचे हे नेहमीचं झालय, अशी टीका विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना केली़
ताैक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस गुरुवारी खेड दाैऱ्यावर आले हाेते़ यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला़ पत्रकारांशी बाेलताना त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली़ ते म्हणाले की, मागील निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजून पूर्णपणे मिळालेली नाही़ किमान आता तरी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. सलग दुसऱ्या वर्षी चक्रीवादळाचा दणका कोकणाला बसला आहे. या वादळामुळे कोकणाचं मोठं नुकसान झाले आहे, मात्र, गेल्यावर्षी जाहीर केलेली मदत जनतेपर्यंत पाेहाेचलेली नाही. केवळ काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं हेच काम आघाडी सरकारकडून सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले़
तालुक्यातील बोरज-घोसाळकरवाडी नजीक सोमवारी (१७ मे) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वादळामुळे तुटलेल्या ३३ केव्हीच्या विद्युत भारीत तारेचा स्पर्श झाल्याने प्रकाश गोपाळराव घोसाळकर व वंदना प्रकाश घोसाळकर या दांपत्याचा जागीच मृत्यू झाला होता. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोसाळकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी राज्य सरकारकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू़ तसेच कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार असलेल्या सदस्याला नोकरी देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले.