लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : भारतात लोकशाही आहे. त्यामुळे कोणालाही कोठेही दौरा करण्याचा अधिकार आहे. अर्थात आता ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरीत येत असले तरी येथील आमदार, खासदार यहसायुतीचेच असतील, असा ठाम दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.
रविवारी रत्नागिरीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी रत्नागिरीत होत असलेल्या नवनव्या कामांचा आवर्जून उल्लेख केला. सोमवारी उद्वव ठाकरे रत्नागिरीमध्ये येणार आहेत. त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, कोणीही कोठेही दौरा करू शकतो. मात्र त्याला किती प्रतिसाद मिळतो, त्याचे मतामध्ये कितीसे रुपांतर होते, यावर त्या राजकीय पक्षाचे अस्तित्त्व अवलंबून असते. त्यांनी दौरा केला तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी - रायगडमध्ये महायुतीचाच खासदार असेल. या सर्व ठिकाणी महायुतीचेच आमदार निवडून येतील, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षण देताना ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे आणि हे सरकार तो शब्द पाळेल, असे त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयावर बोलताना सांगितले. आमदार गणपत गायकवाड यांनी केलेले फायरींग अयोग्यच आहे. कोणीही त्याचे समर्थन करणार नाही. लोकप्रतिनिधीही अशा पद्धतीने वागू नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्यातील सर्वात उंच पुतळा, कोकणातील सर्वात उंच अशी श्री विठ्ठलाची मूर्ती यांचे लोकार्पण तसेच इतर कामांचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.