मोरीचे काम अर्धवट
राजापूर : तालुक्यातील पूर्व भागातील पाचल जवळेथर मार्गावरील तळवडे येथील मोरीचे काम दोन महिने अर्धवट स्थितीत आहे. पावसाळ्यापूर्वी किमान रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. मोरीसाठी रस्ता खोदून ठेवला असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
यात्रा रद्द
चिपळूण : सलग दुसऱ्या वर्षी ऐन शिमगा, गुढीपाडवा काळातच कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने चैतावली यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. रामपूर येथे चैतावली यात्रा आयोजित करण्यात येते. आसपासच्या गावातही यात्रा होत असते. भाविकांची गर्दी या दरम्यान होते. मात्र कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी यात्रा रद्द झाली आहे.
कोरोना केंद्राला मदत
देवरूख : संगमेश्वर केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे देवरूख येथील कोरोना केंद्राला उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तालुक्याचे सभापती जया माने व संघटनेचे अध्यक्ष अभी कोळपे यांच्या मार्गदर्शनातून एम-९५ मास्क, ग्लोव्हज, व्हिटॅमिन-सी व डीच्या गोळ्या वितरीत करण्यात आल्या.
मर्यादित बसफेऱ्या
गुहागर : गुहागर-चिपळूण मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या बंद आहेत. मात्र आगारातून चिपळूण ते गुहागर मार्गावर मर्यादित फेऱ्या सुरू आहेत. या बसफेऱ्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेनुसार सुरू असल्याची माहिती गुहागर आगारप्रमुख वैभव कांबळे यांनी दिली.
रक्तदान शिबिराचे आयोजन
देवरूख : श्री साई तरुण मित्रमंडळ, माळवाशी, वास्करवाडीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सहकार्याने दिनांक १ मे रोजी वास्करवाडी येथे सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर होणार आहे.
सिलिंडर वितरणात अडचणी
रत्नागिरी : कोरोनामुळे एलपीजी सिलिंडर वितरणात समस्या निर्माण झाली असून, ग्राहकांना सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. एक दिवसापासून तीन दिवसांपर्यंत प्रतीक्षेचा काळ वाढला आहे. संसर्गाचा धोका लक्षात घेता आगामी काळात प्रतीक्षा कालावधीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.