शिवाजी गोरे ल्ल दापोली अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केलेली सुरूवात आणि त्याला ‘लोकमत’ने दिलेली साथ यामुळे सामाजिक बहिष्काराच्या एका प्रकरणाला सकारात्मक अंतिम स्वरूप आले. आता कोणालाही वाळीत टाकायची अनिष्ट प्रथा यापुढे कायमची बंद करायची, असा निर्णय तालुक्यातील आडे येथील १९ गावांच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, जात पंचायतीविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एल्गार पुकारला असून, उद्या रविवारी महाड येथे होणाऱ्या सभेकरिता कोकणातून १०० हून अधिक वाळीत प्रकरणे चर्चेला येणार आहेत. जात पंचायतीची आडे गटाची १९ गावांची वार्षिक बैठक शुक्रवारी आडे- पाडले येथे झाली. या बैठकीला १९ गावांतील पदाधिकारी उपस्थित होते. आडे गट अध्यक्ष सुरेश म्हादोकर, उपाध्यक्ष नरेंद्र आगे्र, सेक्रेटरी जगदीश कलमकर या पदाधिकाऱ्यांनी जात पंचायतीच्या वार्षिक सभेत समाज प्रबोधनाचे काम केले. समाजहितासाठी सर्वांनी एकत्र यावे. वाळीत प्रकरणाची गंभीर दखल जात पंचायतीने घेतली आहे. यापुढील काळात गावातील एकही कुटुंब वाळीत राहणार नाही, यासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. आता या गटातील एखाद्या गावात कोणी बहिष्कृत असेल तर तेथील बहिष्कार मागे घेण्याचेही निश्चित करण्यात आले. लोणवडी गावातील मोहन रांगले यांना काही क्षुल्लक कारणावरून गावाने १५ वर्षांपूर्वी वाळीत टाकले होते. वाळीत प्रकरणाच्या सामाजिक बहिष्काराची अंनिसच्या मुक्ता दाभोलकर व अनिस पटवर्धन यांनी दखल घेतली. हे प्रकरण अंनिस व दापोली पोलिसांकडे आल्यानंतर ‘लोकमत’ने या प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम केले. हे प्रकरण दापोली पोलिसात दाखल झाल्यावर वाळीत कुटुंबाची बाजू ‘लोकमत’ने मांडली. अखेर २२ जानेवारी रोजी दापोलीचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पीडित कुटुंब व ग्रामस्थ यांना पोलीस स्थानकामध्ये बोलावून तोडगा काढला. वाळीत कुटुंबाला ‘लोकमत’च्या सडेतोड वृत्तामुळे १५ वर्षांनी न्याय मिळाला. जात पंचायतीने आडे गटातील सभेत वाळीत प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आडे, पाडले, लोणवडी, माळवी, येळणे, वाघिवणे, बोरथळ, चाचवल, आंजर्ले, मुर्डी, केळशी, आतगाव, रोवले, आंबवली, उंबरशेत या गावातील वाळीत प्रकरणे संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत समाजहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. आजही अनेक गावात वाळीत टाकण्याची अनेक प्रकरणे आहेत. एखाद्याला वाळीत टाकून सामाजिक बहिष्कार घालणे हा गुन्हा आहे. यापूर्वी परंपरेने चालत आलेल्या जुन्या, अनिष्ठ रुढी बंद करुन भविष्यात समाजाची प्रगती होईल, त्यादृष्टीने पाऊल टाकण्यासंदर्भात चर्चा झाली. कोकणात वाळीत टाकण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात आहे. वाळीत टाकण्याची नवनवीन प्रकरणे दिवसेंदिवस समोर येऊ लागली असून, वाळीत टाकणे हा प्रकार फार गंभीर असल्याचे कोर्टाने फटकारल्यानंतर प्रशासनाला जाग आली. कोर्टाच्या आदेशाने रायगड जिल्ह्यात अनेक प्रकरणात गुन्हे दाखल झाले. वाळीत टाकल्याप्रकरणी गुन्हे दाखल होऊ लागल्याने पीडित कुटुंब तक्रार दाखल करण्यासाठ पुढे येऊ लागली आहेत. कोकणातील वाळीत प्रकरणाची गंभीर दखल कोर्टाने घेतल्यानंतर प्रशासन जागे झाले. तसेच कोकणातील वाळीत प्रकरणे मोडीत काढण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समितीने जात पंचायतीविरोधात एल्गार पुकारला असून, वाळीत कुटुंबांना न्याय देण्यासाठी ८ फेब्रुवारी रोजी महाड येथे जाहीर मेळावा होणार आहे. जात पंचायतीच्या सामाजिक बहिष्कारात अनेक कुटुंबे शापित जीवन जगत आहेत. सामाजिक बहिष्काराचे असहाय्य चटके बसल्याने अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. सामाजिक बहिष्काराबाबत समाज व प्रशासन गंभीर नसल्याच्या घटना वारंवार पुढे येऊ लागल्या आहेत.
यापुढे एकालाही वाळीत टाकायचं नाही...
By admin | Published: February 08, 2015 1:03 AM