चिपळूण : कोणाला कौले, कोणाला पत्रे, तर कोणाला आर्थिक मदत देत आमदार शेखर निकम यांनी नुकसानाचा पाहणी दौरा सुरू केला आहे. पंचनाम्यापासून कोणीही वंचित राहता कामा नये, अशा कडक सूचना प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.
तौक्ते चक्रीवादळाने चिपळूण, संगमेश्वर मतदारसंघातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेकडो कुटुंबांची घरे, गोठे, शासकीय इमारती, आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आमदार निकम यांनी चिपळूण, देवरूख आणि संगमेश्वर या ठिकाणी पाहणी दौरा सुरू केला आहे.
देवरुख येथे हरपुडे, निवळी, आदी गावांना ते भेटी देणार आहेत. नायरी, निवळी, निनावे येथे वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या ठिकाणी अधिकाऱ्यांसह पाहणी करणार आहेत.
वादळ झाल्यानंतर तत्काळ चिपळूण, देवरुख तहसीलदार यांच्याकडून मतदारसंघातील गावात झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. नायरी, निवळी, सावर्डे येथे त्यांनी अनेक लोकांना मदतही केली.