खेड : कोकणात दरडी कोसळून पुन्हा कोणाचा जीव जाऊ नये, यासाठी सरकारने सर्वेक्षण करावे, अशी मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. खेड येथे त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.
माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी खेड सभापती निवास येथे पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संपूर्ण कोकण या पावसात उद्ध्वस्त झालं आहे. डोंगर खचले आहेत, घरांवर दरड कोसळून माणसे मेली आहेत. परिस्थिती स्थिर करण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. खेड व चिपळूणमध्ये व्यापाऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. मी स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी यांच्यासोबत याबाबत बोलणार आहे. त्यांनी स्वतः लक्ष घालून ज्याप्रमाणे २००५मध्ये मदत दिली, त्याच प्रकारे पूरग्रस्त, दरडग्रस्त यांना तातडीने मदत देण्याची विनंती करणार आहे. हा निसर्गाचा प्रकोप आहे. मानवी चुकांमुळे हे घडले नसले तरी आता शासनाने संपूर्ण कोकणचे सर्वेक्षण करून दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी मी शासनाकडे करत आहे. ज्यामुळे भविष्यात दरड कोसळून कोणाचा जीव जाणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख विजय जाधव उपस्थित होते.