चिपळूण : तालुक्यातील काही गावांमध्ये अंगणवाड्यांची स्थिती बिकट आहे. तर काही अंगणवाड्यांमध्ये गेले वर्षभर मुलेच नाहीत. काही अंगणवाड्यांमध्ये मुलांची पटसंख्या कमी आहे. त्यामुळे या अंगणवाड्यांना दिला जाणारा पोषण आहार जातो कुठे, असा सवाल पंचायत समिती सदस्या धनश्री शिंदे यांनी शुक्रवारी झालेल्या मासिक सभेत उपस्थित केला.चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती पूजा निकम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत प्रारंभी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाल्याबद्दल सर्वानुमते त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले.या सभेला चिपळूण आगाराचे अधिकारी व राष्टÑीय महामार्ग विभागाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली. एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत या विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्या शिंदे यांनी सांगितले की, चिपळूण तालुक्यातील एक-दोन अंगणवाड्यांमध्ये मुलेच नाहीत तर काही अंगणवाड्यांमध्ये मुलांची पटसंख्या कमी आहे. त्यामुळे या अंगणवाड्या चालू ठेवाव्यात की बंद कराव्यात, असा सवाल केला. यावर सभापती पूजा निकम व गटविकास अधिकारी यांनी सांगितले की, ज्या अंगणवाड्यांमध्ये मुले व पटसंख्या कमी आहेत अशा अंगणवाड्यांना भेट देऊन सर्वेक्षण करावे, अशा सूचना यावेळी दिल्या.आॅगस्ट महिन्यामध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेमार्फत शंभर टक्के अनुदानावर चवळी व हरभरा बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचे वाटप सध्या सुरू आहे. तसेच तालुक्यातील भातशेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून, लाभार्थ्यांचे खाते क्रमांक घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती कृषी अधिकारी एस. जी. जानवलकर यांनी दिली.योजना मंजूर पण पाणी कुठे आहे?चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील नळपाणी योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. मात्र, गावात पाणी आहे कुठे, असा सवाल सदस्य नितीन ठसाळे यांनी केला.वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती जाधव यांनी डिसेंबर महिन्यात राबविण्यात येणारी मिशन इंद्रधनुष्य मोहीम २ डिसेंबरपासून तीन टप्प्यात सुरू होणार असल्याचे सांगितले. त्याचे नियोजन करण्यात आले असून, ० ते २ वर्ष वयोगटातील बालके लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचे काटेकोर नियोजन झाल्याचेही त्यांनी सांगितले.
अंगणवाड्यांत पटसंख्या नाही, आहार जातो कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:48 PM