जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत़. त्यामुळे अनेक कुटुंबीयांसमोर जगावं कसं, असा प्रश्न उभा राहिला आहे. एकेका कुटुंबावर तीन-चार व्यक्ती गमावण्याची वेळ आली़. त्यामध्ये कुटुंबातील कमावता व्यक्तीच गेल्यावर पुढे काय? त्यांच्या मुलाबाळांचे कसं होणार? अनेकांनी व्यवसाय व अन्य कारणासाठी बँका, खासगी वित्तीय संस्था, पतपेढ्या तसेच खासगी व्यक्तींकडून कर्जे उचलली असतील तर अशा व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्यांच्यावर असलेल्या कर्जाचे काय? होणार? त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कसा उतरणार? परिस्थिती नसल्यास त्यांचे कर्ज फेडणार कोण? असे अनेक प्रश्न, समस्या कोरोनामध्ये अशी व्यक्ती दगावलेल्यांच्या नातेवाईकांसमोर आ वासून उभे राहिले आहेत. त्यामुळे कोरोनाने कमावता व्यक्ती दगावल्यावर त्यांच्या घरच्यांची अवस्था काय होते, हे ज्याचे जाते त्यालाच कळते, असेच म्हणावे लागेल़.
सुरुवातीला कोरोनावरील लस केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाशी लढा देणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना देण्यात आली होती़. त्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतरच्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली होती़. रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो लोकांना या लसीकरणाचा फायदा झाला आहे. मात्र, जिल्ह्याची लोकसंख्या पाहता शासनाकडून येणाऱ्या लसीचे प्रमाण फार कमी असल्याची ओरड कायम सुरु आहे. तरीही जशी लस येईल त्या प्रमाणात आरोग्य विभागाकडून जास्तीत जास्त लोकांना देण्यावर भर देण्यात येत आहे. शासनाकडून येणाऱ्या लसीचे प्रमाण कमी असल्याने आरोग्य विभाग तरी किती जणांना लस देणार, असा प्रश्न कायमचाच आहे. लस घेतलेल्यांची प्रतिकारशक्ती वाढलेली असल्याने कोरोना झालेले अनेकजण बरे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोक आपल्याला लस कशी मिळेल, यासाठी धडपडत आहेत. सुरुवातीच्या काळात लसीकरणाबाबत अनेक चुकीच्या बाबींचा प्रसार केला गेल्याने लोक लसीकरण केंद्रावर जाण्यास तयार नव्हते. मात्र, लस घेतल्याचे महत्त्व समजू लागल्यावर लोकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ लागली. एकीकडे लसीचा पुरवठा कमी तर दुसरीकडे लस घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांना लसीचे महत्त्व उशिरा समजले असले तरी शासनाने त्याचा पुरवठा जास्तीत जास्त प्रमाणात करणे आवश्यक आहे.
सध्या काही ठिकाणी लसीकरणामध्ये राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एका राजकीय पक्षाने प्रयत्न करुन लसीकरण करण्याचे आयोजन केल्यानंतर त्याच्या बरोबरच्या राजकीय पक्षाने लसीकरण केंद्र बदलून जवळच्या अन्य ठिकाणी नेल्याने कार्यकर्त्यांमध्ये आपापसात वाद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आपापसात भांडू लागले आहेत. त्यासाठी राजकारण खेळून लोकांना वेठीस न धरता सर्वांनाच लसीचा फायदा कसा होईल, याकडे राजकारण खेळणाऱ्या लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.