देवरुख : झिरो पेंडन्सीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेकडून सुरु असणारी कामे अपूर्ण असता कामा नयेत, अशा सक्त सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्याची अमलबजावणी करण्यासाठीच आपला तालुकानिहाय दौरा सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली.
जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी बुधवारी संगमेश्वर तालुक्याचा दौरा केला. देवरूख पंचायत समिती कार्यालयात त्यांनी सकाळी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, सभापती जयसिंग माने, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर, भारती सरवणकर यांच्यासह तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जाधव यांनी जलजीवन मिशन आणि मनरेगा या दोन योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अमलबजावणी व्हावी, याचा फायदा जिल्हावासीयांना व्हावा, हाच प्रमुख उद्देश या बैठका घेण्याचा असल्याचे सांगितले. संगमेश्वर पंचायत समितीचे बहुतांश सर्व योजनांचे कामकाज चांगले आहे. सभापती जयसिंग माने आणि सर्व अधिकारी उत्तम काम करत आहेत. यामुळे सर्व योजना तळागाळात पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. आपला जिल्हा, आपला तालुका आपलाच समजून अधिकाऱ्यांनी काम केल्यास त्यातून शाश्वत विकास घडेल, असे त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागामार्फत लसीकरण चांगल्याप्रकारे होण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांनी त्याच्या अखत्यारित असलेल्या गावांमध्ये नियोजन केल्यानंतर गावनिहाय लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. काही विभागांमध्ये जी पदे रिक्त आहेत, विशेष करून पशुसंवर्धन विभागाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी या गोष्टीत गांभीर्याने लक्ष दिल्याने ही रिक्त पदे लवकरच भरली जातील, असे सांगितले. अनेक विभागात बहुसंख्य पदे रिक्त आहेत, त्यांना सांभाळून घेत सध्याचे अधिकारी व कर्मचारी चांगले काम करत असल्याचे जाधव म्हणाले.
आठवी ते बारावीचे वर्ग लवकरच सुरू होणार असून, यासाठी गरज पडल्यास जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी इमारती उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी सभापती जयसिंग माने यांनीही मुख्याध्यापकांची बैठक घेऊन याचे नियोजन केल्याचे जाधव यांनी सांगितले.