खेड : तालुक्यातील कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी स्वतःहून येणाऱ्या नागरिकांना कर्मचारी वेगवेगळी कारणे सांगून परत पाठवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकट्यासाठी लसीकरणाची ‘व्हायल’ उघडू शकत नसल्याचे सांगून खारी येथील ज्येष्ठ नागरिक गाेपीनाथ पवार यांना चक्क घरी पाठविण्यात आले. आराेग्य केंद्राच्या या कारभाराबाबत नाराजीचा सूर उमटत असून, याची चाैकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
गोपीनाथ पवार हे बुधवारी सायंकाळी ४ वाजता कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी गेले हाेते. त्यावेळी त्यांना लस न देताच घरी पाठविण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी लसीकरणाठी गेले असता, त्यांनाही, आमच्या कार्यक्षेत्रातील सोडून अन्य नागरिकांना लस देत नाही, तसेच याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांनी तोंडी आदेश दिल्याचे आरोग्य सहायक प्रतीक्षा गावडे यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोरे यावेळी अनुपस्थित होते.
तालुका आरोग्य विभागाकडे याबाबत चौकशी केली असता, असे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले.
तालुक्यातील प्रत्येक केंद्रात दिवसात शंभर लोकांचे लसीकरण अपेक्षित असताना, गेल्या तीन आठवड्यात झालेल्या आठ दिवसात सुमारे ४१ टक्के लोकांना लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन आठवड्यात आठ दिवसात केवळ ३४८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. शासकीय लसीकरण उद्दिष्ट अपेक्षित ८०० लाभार्थी संख्या असताना, सध्याच्या स्थितीत केवळ उद्दिष्टाच्या सुमारे ४३ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या लाल फितीच्या कारभारामुळे व जनजागृती करण्यात अपयश आल्याने लसीकरण उद्दिष्टपूर्ती झालेली नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी खेड तालुक्यात कूर्मगतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेची चौकशी करून, दोषी व उदासीन कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.