लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत येथील नगर परिषदेने कोविड केअर सेंटर उभारण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेची ऑनलाइन विशेष सभा २६ रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. नगर परिषदेने खर्च न परवण्याचे कारण सांगत पेड कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन केले आहे. मात्र, नागरिकांमधून पेड स्वरूपातील सेंटरला विरोध होत आहे. त्यामुळे या सभेत काेणता निर्णय हाेणार, हे पाहायचे आहे.
सध्या तालुक्यात १४०० हून अधिक रुग्ण कोरोनाबाधित असून ते कामथे उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे येथील आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ लागला आहे. अनेकदा रुग्णांना बेडही मिळत नाही. विशेषतः शहरातील रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने अनेकांची गैरसोय होऊ लागली आहे. चिपळूण दौऱ्यावर आलेल्या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याची गंभीर दखल घेऊन शहरात कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत नगर परिषदेला सूचना केली होती. त्यानुसार शहरातील काही डॉक्टरांच्या मदतीने कै. अण्णासाहेब क्रीडा संकुलात पेड कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन आहे.
याठिकाणी ४० बेडचे सुसज्ज सेंटर उभे करण्यासाठी सुमारे एक कोटी ७० लाख रुपये खर्च येणार आहे. यातील काही प्राथमिक सुविधा नगर परिषद देणार असून उर्वरित खर्च अपरांत हॉस्पिटल करणार आहे. या सेंटरचा अंतिम निर्णय २६ एप्रिल रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या ऑनलाइन सभेत घेतला जाणार आहे. शुक्रवारी प्रशासन, लोकप्रतिनिधी व हॉस्पिटलच्या प्रमुखांनी त्यादृष्टीने या संकुलाची पाहणी केली. त्यांनी खेडेकर क्रीडा संकुलात ४० बेडचे कोविड सेंटर सुरू होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे.