रत्नागिरी : आपला नातेवाईक कोरोना झाल्यामुळे रुग्णालयात दाखल असताना रुग्णालयाबाहेर थांबलेल्या नातेवाइकांच्या जीवाची घालमेल थांबत नाही. अशा नातेवाइकांना जेवणाखाण्यासह राहण्यासाठीही मदतीचा हात देण्यासाठी सामाजिक संस्था, व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत. रुग्ण कोण आहे, कुठल्या जातीधर्माचा आहे हे न पाहता आता केवळ एकच धर्म पाळला जातोय, तो माणुसकीचा. पहिली जात आहे ती फक्त गरज. ना ओळखीचे ना पाळखीचे. पण मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. अशा पुरुषांसह महिला सहकाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे.
गतवर्षी लाॅकडाऊन काळात रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाइकांची जेवणखाण्याची आबाळ होऊ लागल्याने अनेक संस्थांनी चहा, नाश्ता, दोन वेळचे जेवण सलग तीन ते चार महिने मोफत उपलब्ध करून दिले होते. यावर्षी शिवभोजन थाळीमुळे जेवणाचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला असला तरी रुग्णसंख्या वाढली असल्याने अनेक रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयाच्या परिसरातच राहत आहेत. त्यांच्यासाठी काही संस्था पुढे सरसावल्या असून, त्यांना जेवण, नाश्ता उपलब्ध करून दिला जात आहे. मूव्हमेंट फाॅर पीस अँड जस्टीस, जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था, स्वामी स्वरूपानंद पतसंस्था रुग्णांच्या नातेवाइकांना जेवण उपलब्ध करून देत आहेत.
संपर्क युनिक फाऊंडेशन, ह्युमिनिटी कमिटी तसेच खैर ए उम्मत कमिटी, मिरकरवाडा यांनी एकत्र येत महिला रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची राहण्याची सोय दूर केली आहे. रुग्णालयासमोरील बंद घरमालकांशी बोलून ते घर ताब्यात घेऊन त्याची स्वच्छता करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर त्या ठिकाणी बसण्यासाठी, झोपण्यासाठी सुविधा उपलब्ध करत असताना, विजेसह पंखे उपलब्ध करून दिले आहेत. शिरगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता व बायोटाॅयलेट, पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उद्यमनगर येथील महिला रुग्णालय कोविड केअर सेंटर घोषित करण्यात आले आहे. रुग्णालय मुख्य शहरापासून लांब आहे. शिवाय लाॅकडाऊनमुळे हॉटेल्समध्ये केवळ पार्सल सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय होत आहे. रुग्णाला काही मदत लागली, काही औषधे किंवा साहित्य आणावे लागले तर नातेवाईक रुग्णालयाच्या आसपास थांबत आहेत. पण त्यांच्या जेवणाखाण्याचे हाल होत आहेत. हे लक्षात घेऊन मूव्हमेंट फाॅर पीस अँड जस्टीजच्या ॲड. खतीजा प्रधान दरदिवशी साठ लोकांना जेवण देत आहेत. सुरुवातीला काही दिवस त्यांनी नाश्ता करून दिला. मात्र नाश्त्यापेक्षा पोटभर जेवणाची आवश्यकता असल्याचे लक्षात आल्याने त्या स्वत:च्या घरी जेवण शिजवून कंटेनरमध्ये पॅक करून रुग्णालयात दररोज दुपारी न चुकता पोहोचत आहे. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी एक अज्ञात शक्ती उभी राहते. त्या सामाजिक काम करत आहेत, हे पाहून रिक्षाचालक प्रसाद चव्हाण हे त्यांच्या मदतीला धावले आहेत. दररोज जेवण घेऊन जाण्यासाठी प्रसाद चव्हाण यांची रिक्षा उपलब्ध असते आणि तीही विनामोबदला. श्रुती व सूर्यकांत रांदपकर, नईम काजी, वहिदा शेख ही मंडळींही त्यांना सहकार्य करत आहेत.
संपर्क युनिक फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोना केंद्रात दाखल असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून दिली जात आहे. शिवाय जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बेड उपलब्ध होऊन त्याच्यावर उपचार सुरू होईपर्यंत या संस्थेचे पदाधिकारी मदत करतात. रुग्णाच्या नातेवाइकांनाही राहण्याची, खाण्याची व्यवस्था झाली आहे का, याकडेही ते लक्ष देतात. उपचार सुरू असतानाच दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही तेच पुढे येत आहेत. मृतदेहाच्या अंगावर जर काही दागिने किंवा मोबाइलसारख्या वस्तू निदर्शनास आल्या तर त्या प्रामाणिकपणे नातेवाइकांकडे सुपूर्द केल्या जात आहेत. प्रामाणिकता व माणुसकीतून सर्व सामाजिक संस्था सामाजिक बांधिलकी जपत आहेत.
कोट घ्यावा :
शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठीच जेवण देण्याची निश्चित केले. पोषक आहाराबरोबर स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेण्यात येत आहे. संस्थेच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.
- ॲड. खतीजा प्रधान, मूव्हमेंट फाॅर पीस ॲण्ड जस्टीज
कोट घ्यावा
जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून रुग्णांना उपचारासाठी आणले जात आहे. गतवर्षीपासून आम्ही कार्यरत आहोत. रुग्णांना दाखल करून योग्य उपचार सुरू होईपर्यंत आम्ही त्यांना मदत करतो. नातेवाइकांच्या राहण्याबरोबर खाण्याची व्यवस्था करून देतो. काही वेळा मृत्यू झालेल्या रुग्णाबरोबर नातेवाईक असतात किंवा नसतात, अशा वेळी त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतो.
- ईस्माईल नाकाडे, संपर्क युनिक फाऊंडेशन, रत्नागिरी