लांजा : तालुक्यातील पालू येथील ५२ वर्षीय प्रौढाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली हाेती. या घटनेचा तपास सुरू असताना त्यांच्या पँटच्या खिशात चिठ्ठी सापडल्याने आत्महत्येचा गुंता वाढला आहे. चिठ्ठीतील मजकुरावरून पाेलिसांनी दाेघा संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पालू बौद्धवाडी येथील भिकाजी रत्ना कांबळे (वय ५२) यांच्या घरातील सर्व लोक मुंबईत राहतात. गावी ते एकटेच राहत होते. शुक्रवारी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या दरम्यान वाडीतील ग्रामस्थांनी त्यांच्या घरातील वीज बंद असल्याचे पाहिले, तर घराचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी घरामध्ये जाऊन पाहिले असता त्यांनी घराच्या वाशाला लायलाॅन दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पाहिले.
या घटनेची माहिती लांजा पोलिसांना दिल्यावरून पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव, श्रीकांत जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता. पंचनामाच्या वेळी भिकाजी यांच्या पँटच्या खिशात एक चिठ्ठी आढळली होती. यामध्ये याच वाडीतील दोघांची नावे टाकण्यात आल्याने चौकशीसाठी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, भिकाजी यांना लिहिता वाचता येत नसल्याने त्यांच्या खिशामध्ये ही चिठ्ठी आली कशी. तसेच त्यांनी दुसऱ्याला सांगून ही चिठ्ठी लिहून घेतली की, अन्य काेणी चिठ्ठी खिशात ठेवली याचा शाेध लांजा पाेलीस घेत आहेत.