चिपळूण ,दि. ३० : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला वेग देण्याच्या दृष्टीने भूसंपादन झालेल्या जागेतील घरे खाली करण्याची नोटीस घरमालकांना बजावण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील १३ गावांतील १७७ घरमालकांना नोटीस बजावताना घर खाली करण्यास सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तर काही घरमालकांनी आपल्या इमारती स्वत:च तोडायला सुरुवात केली आहे.
चिपळूण तालुक्यातील खेरशेत व आगवे गावापासून याबाबतची नोटीस बजावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. १३ गावांतील १७७ घरे, इमारतींचा यामध्ये समावेश आहे. ज्यांना मोबदला देण्यात आला आहे अशांनाच नोटीस बजावण्यात आली आहे.
नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत घर खाली करण्याचे आदेश त्यात देण्यात आले आहेत. उर्वरित ११ गावांमधील नोटीसचे वाटप सुरु आहे. चिपळूण शहरातील घरे पहिल्या टप्प्यात वगळण्यात आली आहेत. शहरातील जमिनीचे संपादन झाल्यानंतर मालमत्ता पाडण्याच्या नोटीस बजावल्या जाणार आहेत.
चिपळूण तालुक्यामध्ये आतापर्यंत २६५ कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटप करण्यात आले आहे. चिपळूण शहर व तालुक्यातील १३ गावांच्या उर्वरित मोबदला वाटपासाठी २७७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.