लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : येत्या १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील व्यक्तीला कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता जिल्ह्यातील १८ ते ४५ वयोगटातील सुमारे ६ लाख ६५ हजार व्यक्तींना या लसचा लाभ घेता येणार आहे.
पहिल्या फळीतील कोरोना योद्धे, कोमाॅर्बिड व्यक्ती आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक अशा एकूण १ लाख ३३ हजार ६६ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. त्यामुळे केंद्राच्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्याला लसचा मुबलक प्रमाणात पुरवठा झाल्यास १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींना लसचा लाभ मिळणार आहे.
जिल्ह्याला पहिल्या डोससाठी २ लाख ९६ हजार ८५४ इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १५ एप्रिलपर्यंत केवळ ३३ टक्के इतकेच पूर्ण झाले आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण ९६८६६ पैकी ४५ वर्षांवरील ६२,४५४ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. यापैकी ६० वर्षांवरील ३७,८४८ ज्येष्ठ नागरिकांंना लस दिली आहे.
आठवड्यासाठी साठा केवळ १० हजार
n जिल्ह्याला कोवॅक्सिन तसेच कोविशील्ड अशा दोन प्रकारच्या लसचा पुरवठा केला जात आहे.
n या आठवड्यात जिल्ह्यासाठी ५ हजार ८३० इतकी कोव्हॅक्सिन लस आणि कोविशील्डची ५ हजार लस उपलब्ध झाली होती. त्यातून सध्या जिल्ह्यात लसीकरण सुरू असून काही केंद्रे सध्या बंद आहेत.
४५ पेक्षा जास्त वयाचे ६९ टक्के लसीकरण
जिल्ह्यात ४५ वर्षे वयावरील ५२,७६२ जणांना पहिला डोस देण्यात आला तर दुसरा डोस या ९६९२ इतक्या जणांना देण्यात आला.
१६ एप्रिलपर्यंत कोमाॅर्बिड असलेल्या जिल्ह्यातील २६,२७० व्यक्तींना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला.
दुसऱ्या डोसचे काय
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. पहिल्या डोससाठी जिल्ह्याला २ लाख ९६ हजार ८५४ इतके उद्दिष्ट देण्यात होते.
१६ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात १ लाख १३ हजार ६० जणांनी कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डेास घेतला. दुसरा डोस १६,२०० जणांनी घेतला.
पहिला डोस घेणाऱ्यांमध्ये पहिल्या फळीतील कोरोना योद्धे ३४४१२, कोमाॅर्बिड २६२७० आणि ज्येष्ठ ३६१८४ यांचा समावेश आहे.
कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला आणि दुसरा डोससाठी ३ लाख १२ हजार एवढे उद्दिष्ट पहिल्या टप्प्यात देण्यात आले होते.
लसीकरण केंद्र वाढवावे लागणार
केंद्र सरकारने तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच १ मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरणाची घोषणा केली आहे. सध्या सरसकट ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जात आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यास प्रारंभ झाला तर १८ ते ४० वयोगटातील ५,०९, ३८६ जणांना लाभ होईल. तसेच ४१ ते ४५ वयोगटातील सुमारे दीड लाख लोकांनाही लाभ मिळेल. मात्र, सध्या १०९ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. त्यामुळे या नव्या साडे सहा लाख लोकांना लसीकरणासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अधिक केंद्रेही वाढवावी लागणार आहेत.