खेड : तालुक्यातील सुकीवली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ग्रामपंचायत व इतर सरकारी कार्यालयांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या उमा वूड कंपनीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
सुकीवली येथे सुरू करण्यात आलेल्या कारखान्यासाठी सरपंचांची बनावट सही व शिक्का वापरून महावितरणची वीज कनेक्शन घेण्यात आले व फसवणूक केल्याची तक्रार सरपंच शीतल चाळके यांनी येथील पोलीस ठाण्यात केली आहे. याशिवाय ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडेही पत्रव्यवहार करून कंपनीच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापाठोपाठ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
या कंपनीने औद्योगिक कारणासाठी वापरलेले पाणी कोणतीही प्रक्रिया न करताच बाजूच्या शेतात सोडले. सेप्टिक टँक व पाणी जिरविण्याची कोणतीच यंत्रणा न राबविता सांडपाणी कंपनीबाहेर सोडले आहे. कंपनीने बोर्डाची परवानगी न घेताच १०० के.वाय.ए.चा डिजिटल पॉवर जनरेटर सेट बसवून वापर सुरू केला आहे. लाकडाची राख नष्ट केल्याचे कुठलेही रेकॉर्ड ठेवलेले नाही. कंपनीच्या ३३ टक्के जागेवर झाडे लावून हरितपट्टा निर्माण करावयाचा असतानाही ते देखील केले नसल्याचे नोटिसीमध्ये म्हटले आहे. कारखान्यातील केरकचरा, धूळ याची विल्हेवाट न लावता मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवल्याचेही निदर्शनास आले आहे व परवाना न घेताच हा कारखाना सुरू ठेवल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे.