चिपळूण : जिल्ह्यात बांधकाम विभागाकडून निविदा काढून रस्त्याच्या बाजूला सूचना फलक लावले जातात. परंतु, यापैकी काही फलक कमकुवत असल्याने मोडून पडले आहेत. सूचना फलक गायब असल्याने चालकांना अनेक अडचणी येत आहेत.
मानधन वाढविण्याची मागणी
साखरपा : येथील पोलीस पाटलांचे मानधन वाढवून देण्याची मागणी पोलीस पाटलांकडून होत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पोलीस पाटलांकडे विविध गावांचा पदभार देण्यात आला आहे. कोरोना संकटकाळात अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविण्यात आल्या आहेत. परंतु, त्या तुलनेने अपुरे मानधन मिळत आहे.
पदभरतीची मागणी
रत्नागिरी : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ अभियंत्याची पदे रिक्त आहेत. अनेकजण सेवानिवृत्त झाल्यामुळे पदे रिक्त असून त्यावर पदभरतीच झालेली नाही. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या अभियंत्यावर कामाचा ताण वाढला आहे. तातडीने या जागा भरण्याची मागणी करण्यात येत आहे.
विजेचे खांब धोकादायक
गुहागर : तालुक्यात ३९ जिल्हा परिषद शाळांजवळ महावितरणचे खांब गंजले असून धोकादायक बनले आहेत. पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गंजलेले खांब पडण्याचा धोका आहे. तातडीने खांब हलविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
समितीला मुदतवाढ
रत्नागिरी : मागासवर्गीयांची पदोन्नती सरळ सेवेमध्ये प्रतिनिधित्वाची माहिती संकलित करून त्यांचे शासकीय सेवेतील आरक्षण निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दिलासा मिळाला आहे.
ऑनलाइन मार्गदर्शन
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, जिल्हा परिषद कृषी विभाग, रत्नागिरी व शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत खरीप हंगामातील भातपीक लागवड ऑनलाइन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी मार्गदर्शन केले.
कृषी सप्ताह साजरा
दापोली : शासनाच्या कृषी विभागातर्फे कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला. या कालावधीत कात्रण, दमामे, तामोंड व भडवळे गावांमध्ये विविध उपक्रमांनी ही दिवस साजरा करण्यात आला. यावेळी काळा भात लागवड, काजू लागवड, हळद लागवड आदी उपक्रम हाती घेण्यात आले.
वाहतुकीस अडथळा
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आरवली, माखजन, कुंभारखणी रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या कालावधीत सरंद, माखजन बाजारपेठ रस्त्यावर पडलेल्या झाडांचा अडथळा अद्याप दूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनचालकांना अडचणीचे होत आहे.
प्रस्तावाकडे दुर्लक्ष
रत्नागिरी : अस्पृश्यता निवारणासाठी शासनाने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले आहे. त्यासाठी शासनाकडून विशेष अनुदान दिले जाते. मात्र, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात आंतरजातीय विवाहांचे अनेक प्रस्ताव अनेक वर्षांपासून पडून आहेत.
वृक्ष लागवड
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील नांदळज येथील ग्रामदेवता श्री सुखाईदेवी मंदिर परिसरात वृक्ष लागवड उपक्रम आयोजित करण्यात आला होता. संगमेश्वर तालुका व्यापारी संघटना, देवरूख परिमंडळ वनविभाग, नांदळज ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आला.