राजापूर : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक वर्षे लोटली तरी रायपाटण गावातील अर्जुना नदीपलिकडच्या चार वाड्यांकडे जाण्यासाठी दळणवळणाची सुविधा नसल्याने त्या परिसरातील जनतेला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. संपर्कांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या अर्जुना नदीवर वाहतुकीच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल असा पूल बांधावा, अशी मागणी सातत्याने सुरु आहे. आता पूल निर्माण समितीची स्थापना करण्यात आली असून, त्याद्वारे पुलासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याकामी परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. चंदुभाई देशपांडे यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला.रायपाटणच्या मध्यावरून अर्जुना नदीचे दोन भाग झाले असून, नदीच्या पलिकडे एकूण पाच वाड्या आहेत. त्यापैकी गांगणवाडीत जाण्यासाठी आता कायमस्वरुपी वाहतुकीचा पूल झाला असून, उर्वरित चार वाड्यांचा दळणवळणाचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यांना कोणतीच सुविधा नाही. त्या वाड्यांमध्ये बागवाडी, गाडेवाडी, कदमवाडी व बौध्दवाडी यांचा समावेश आहे. या चार वाड्यांची लोकसंख्या सुमारे तेराशे इतकी आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या चारही वाड्यांची होणारी परवड कायम राहिली आहे. एवढ्या कालावधीत ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा करुनही शासनाला हा प्रश्न काही सोडवता आलेला नाही. त्यामुळे त्या चार वाड्यांची गैरसोय होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बांधावरुन कसातरी मार्ग निघतो. पण, खरी समस्या पावसाळ्यात उद्भवते. नाही म्हणायला एक फूट ब्रीज त्या वाडीकडे जाण्याकडे असून, तो धोकादायक ठरला आहे. यापूर्वी बांधकाम विभागाने त्या पुलाचा वापर न करण्याबाबत रायपाटण ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे, अशी स्थिती असतानाच त्या चार वाड्यांतील जनतेने दैनंदिन गरजांसाठी काय करायचे? दररोजचा बाजाररहाट, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा, शासकीय कामे यासाठी नदीपलिकडेच यावे लागते. ग्रामस्थांना भोगाव्या लागणाऱ्या अनंत अडचणी लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते व येळवण गावचे सुपुत्र प्रा. चंदुभाई देशपांडे यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गावचे ग्रामस्थ दादा कोलते यांच्या घरी रायपाटण गावात एक बैठक झाली. त्यावेळी गावातील त्या चार वाड्यांच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. समस्त ग्रामस्थांचे म्हणणे ऐकल्यानंतर हा प्रश्न किती भयानक आहे, याची जाणीव झाली आहे. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढायचा असेल तर प्रथम सर्वांनी पूल निर्माण कमिटी स्थापन करा, अशी सूचना प्रा. देशपांडे यांनी दिली. त्यानुसार कमिटी स्थापन करण्यात आली. अनाजी पाटणकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्ष महादेव रोडे, सचिव प्रसाद पळसुलेदसाई, खजिनदार महेश गांगण यांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून आबा शेट्ये, विलास शेट्ये, संजय निखार्गे, प्रकाश पाटणकर, रमेश बागवे, विठोबा माटल, विलास कोलते, रवींद्र पाटणकर, सीताराम खाड्ये, गजानन खाड्ये, मनोहर खोचाडे, वसत कदम, सल्लागार म्हणून भिकू कोलते, प्रभाकर देसाई यांची निवड करण्यात आली. यापुढील पुलाबाबतचा पाठपुरावा व त्याबाबतची कामे चंदूभाई देशपांडे यांच्या सूचनेनुसार होणार आहेत. (प्रतिनिधी)जनतेचे हाल : आई-मुलाचे गेले प्राणपक्का रस्ता नसल्याने वेळेवर उपचार झाले नाहीत, यामुळे आई व एका मुलाला प्राण गमवावा लागलेला आहे. शासनाला एवढ्या वर्षांत हा प्रश्न काही सोडवता आलेला नाही. त्यामुळे रायपाटण गावातील नदीपलिकडच्या त्या चार वाड्यांतील जनतेचे हाल होत आहेत.
रायपाटण पुलासाठी आता आक्रमक पवित्रा
By admin | Published: March 30, 2016 10:34 PM