लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : तालुक्यातील हर्णै येथील सर्पमित्र भरत जोशी यांनी देशातील अंध व्यक्तींमध्ये कोरोनाबाबत जागृती करण्यासाठी ब्रेन लिपीतील पुस्तक लिहिले आहे. यामुळे अंध व्यक्तींमध्येही कोरोनाबाबत जागृती निर्माण होऊन या रोगावर कशाप्रकारे मात करता येईल याबाबत जागृती निर्माण होणार आहे. हे पुस्तक ते राज्यातील शंभर अंध शाळांना विनामूल्य पाठविणार असल्याचे भरत जाेशी यांनी सांगितले.
काेराेनाने समाजातील कोणत्याही स्तराला सोडलेले नाही. अगदी वयोवृद्धांपासून लहान मुलांपर्यंत ते श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्वांना त्याची लागण झाली आहे. यात अपंग व्यक्तींचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यामुळे या व्यक्तींना कोरोनाबाबत अधिक माहिती मिळावी, कोरोनाच्या लक्षणांची माहिती मिळावी, कोरोनाबाबत काय खबरदारी घ्यावी व त्यावर कशी मात करावी हे कळावे याकरिता भरत जोशी यांनी अंध व्यक्तींकरिता कोरोना बिमारी और इलाज हे राष्ट्रीय भाषेत ब्रेल लिपीमध्ये पुस्तक प्रकाशित केले.
भरत जोशी यांनी अंधांसाठी सर्पस्पर्श, सुनामी, पर्यावरण, जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिन, योगासन यासह विविध पुस्तकांचे ब्रेल लिपीमध्ये प्रकाशन केले आहे. भविष्यामध्ये ते रामदास स्वामी, शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोट, स्वामी गगनगिरी महाराज, आदींवर देखील ब्रेल लिपीमध्ये पुस्तके लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-------------------------
राज्यपालांकडूनही कौतुक
भरत जोशी यांनी कोरोनावर देशभरातील १५ व्यक्तींकरिता लिहिलेल्या कोरोना बिमारी और इलाज या हिंदी पुस्तकाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही राजभवनात भरत जोशी यांना बोलावून कौतुक केले.