मेहरून नाकाडे
रत्नागिरी : तोंडाला पाणी सुटावं असा बारीक आणि लांब बासमती तांदूळ पुलाव, बिर्याणीची लज्जत वाढवतो. सद्यस्थितीत हा तांदूळ अन्य राज्यातून येतो. मात्र आता डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव (रत्नागिरी) येथील भात संशोधन केंद्रात ‘रत्नागिरी १५ एम. एस ५२ हे नवीन वाण विकसित करण्यात यश आले आहे. बासमतीसारखाच लांब असलेल्या या तांदळाचे वाण भातासह पोह्यांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. २०२४-२५ या खरीप हंगामात हे वाण शेतकऱ्यांसाठी सर्वत्र उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून सर्वांना कोकणातील बासमती खायला मिळेल.
बासमतीचे उत्पादन परराज्यात होते. या तांदळाला असलेली मागणी, त्यातून वाढू शकणारे उत्पन्न विचारात घेता शिरगाव (ता. रत्नागिरी) भात संशोधन केंद्रात याबाबत संशोधन सुरू होते. आता या हळव्या जातीचे वाण विकसित करण्यास संशोधन केंद्राला यश आले आहे.
गेल्या खरीप हंगामात रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे, शिरगाव, गाेळप तसेच सिंधुदुर्गातील काही शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर ही लागवड केली होती. प्रति हेक्टर ४५ ते ५० क्विंटल भात उपलब्ध झाल्याने हे वाण यशस्वी ठरले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालगड, ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रयोगासाठी हे वाण दिले जाणार असून, २०२४-२५च्या खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांसाठी हे वाण बाजारात उपलब्ध असेल.
नव्या जातीची वैशिष्ट्ये१) १२० ते १२२ दिवसांत तयार होणारे हळवे वाण२) लांब, बारीक दाणा (७ मिलीमीटर लांब)३) सुवासिक भात४) हेक्टरी ४५ ते ४० क्विंटल उत्पादन५) कोकणच्या लाल मातीत, हवामानात तयार होतो.६) तांदूळासह पोहेही उत्तम प्रतीचे होतात.नामकरण होणारसंशोधन पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्याची उत्पादकता तपासली जात आहे. तूर्तास ‘रत्नागिरी १५ एम. एस. ५२’ हे त्याचे नाव असले तरी या भातासाठी उपयुक्त नाव देण्यात येणार आहे.
कोकणासाठी उपयुक्तशिरगाव येथील धनंजय दाते, कोतवडे येथील मारुती मांडवकर यांनी खरीप हंगामात प्रायोगिक तत्त्वावर रत्नागिरी १५ एम.एस. ५२ वाणाची लागवड करून उत्पादन घेतले होते. दोन्ही शेतकऱ्यांनी कोकणच्या लाल मातीत हे उत्पादन घेण्यास उपयुक्त असून, उत्पादकताही चांगली असल्याची समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केली.कोकणातील हवामानात तयार होणारे, लांब, बारीक व सुवासिक वाण विकसित करण्यास यश आले आहे. हे हळवे वाण असून, वरकस जमिनीत सावली नसलेल्या क्षेत्रात पीक चांगले येते. उत्पादकता चांगली आहे. हे भात रबर सेलरवर भरडाई केल्यास तुकडा न होता अखंड तांदूळ मिळेल.विजय दळवी, संशोधन अधिकारी, भात संशोधन केंद्र, शिरगाव