रत्नागिरी : सरकार वाचनालये सुरू करण्यास परवानगी देत नसल्याने आता पुस्तके लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा उपक्रम रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने हाती घेतला आहे. त्यासाठी वाचनालयाच्या अॅपवरून पुस्तकाची मागणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाचक प्रेरणा दिनापासून हा उपक्रम सुरू होत असल्याची घोषणा वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.कोरोनामुळे अद्याप वाचनालये बंद आहेत. वाचनालयांना परवानगी मिळाली तरी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना वाचनालयात येणे अशक्य आहे. त्यामुळे वाचनालयाने वाचकांसाठी घरपोच पुस्तके योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. वाचक सभासदांसाठी त्यांच्या मागणीनुसार महिन्यातून दोन वेळा पुस्तक बदलून नवीन पुस्तक घरपोच दिले जाणार आहे.
जिल्हा नगर वाचनालयाचे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेऊन त्या अॅपमधून वाचकांना हवे असणारे पुस्तक निवडून त्याचा क्रमांक वाचनालयात दूरध्वनीद्वारे अथवा मोबाईल द्वारे नोंदवता येईल. नोंदणी केल्यानंतर पुढच्या दिवशी अथवा सोयीनुसार संबंधित पुस्तक वाचकांना पाठविण्यात येणार आहे. जुने पुस्तक वाचकाने वाचनालयाच्या संबंधित पुस्तक घेऊन आलेल्या प्रतिनिधीकडे जमा केल्यानंतर नवीन पुस्तक वाचकाला उपलब्ध करून देण्यात येईल. महिन्यातून दोन वेळा पुस्तक बदलून देण्याची ही सेवा दिली जाणार आहे.
''घरपोच पुस्तक पोच योजनेबरोबरच काही डिजिटल आॅडिओ बुक्स सुविधा प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. वाचनालयाच्या सर्वच उपक्रमांना वाचक सभासद भरघोस प्रतिसाद देतात. तसाच प्रतिसाद नव्याने सुरू होत असलेल्या योजनेलाही वाचक देतील, अशी अपेक्षा आहे.''अॅड. दीपक पटवर्धन, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय.