हर्षल शिरोडकर
खेड : आता शिवसेना भवनचे दरवाजे सताड उघडे असतात. कोणीही या. कोण नेता, कोण उपनेता अशी खिरापत वाटणे सध्या सुरू आहे. आमदार, खासदार, मंत्र्यांना जर आधीच भेटला असतात, तर ही वेळ आली नसती. केवळ बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना किती वर्षे तुम्ही ब्लॅकमेल करणार आहात, असा सणसणीत प्रश्न माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला आहे.
आपल्या जामगे येथील निवासस्थानी आलेल्या रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात उद्धव ठाकरे मंत्रालयात फक्त तीनवेळा आले. कोकणावर वादळाचे, महापुराचे संकट आले. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार चार दिवस कोकणात येऊन बसले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले नाहीत आणि आता बापबेटे बाहेर पडले आहेत. आता शिवसेना भवनाचे दरवाजे सताड उघडले आहेत. या कोणीही. बसा. भेटा, असे सुरू आहे. हे आधीच झाले असते तर ही वेळ आली नसती, असे कदम म्हणाले.राष्ट्रवादीच्या लोकांना पैसे देऊन अजितदादा पवार यांनी शिवसेनेच्या आमदारांना संपवण्याची संधी घेतली. आमदारांचे म्हणणे ऐकून थोडे जरी लक्ष उद्धव ठाकरे यांनी घातले असते तर ही वेळ आली नसती, असेही ते स्पष्टपणे म्हणाले.
पवार यांच्या मांडीवर
बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना किती वर्षे ब्लॅकमेल करणार, असा थेट प्रश्नही कदम यांनी यावेळी केला. बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही सहमत होतात का? त्यांचे विचार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात होते. मग शरद पवार यांच्या मांडीवर बसताना बाळासाहेबांची आठवण झाली का? का विसर पडला? या साऱ्याची उत्तरे उद्धव ठाकरे यांना द्यावी लागतील, असेही ते म्हणाले. त्यांनी भावनात्मक डायलॉगबाजी थांबवावी, असा टोलाही त्यांनी हाणला.
मीही दौरा करेन
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यांना जाऊ दे ना. त्यांच्यापाठोपाठ मीही महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. वास्तव लोकांसमोर ठेवणार आहे. ५२ वर्षे पक्ष उभा करण्यासाठी काम केले आहे. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मुख्यमंत्रीपद मिळाले. आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा मुलगा म्हणून मंत्रिपद मिळाले. पण पक्ष आम्ही वाढवलाय, हे लोकांना सांगू असेही ते म्हणाले.