शनिवारी रत्नागिरीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्ग, बारसू रिफायनसी, राज्यातील राजकीय वातावरण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी आता उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणं हे महाराष्ट्राला परवडणारं नसल्याचं म्हटलं.
“महाराष्ट्रातील तरूणांना तरुणींना त्यांच्या भवितव्यासाठी भविष्यासाठी या गोष्टी परवडणाऱ्या नाहीत. मूळात पहिल्यांदा जमिनी द्यायच्या नव्हत्या. पण आज ज्या गोष्टी करून ठेवल्यात त्यामुळे महाराष्ट्र विचित्र परिस्थितीत सापडलाय. उद्या महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अशी होईल की सरकारमध्ये पगार देणं शक्य होणार नाही. तेव्हा सरकार कोणाचंही असेल ते पडेल,” असं राज ठाकरे म्हणाले. युनेस्कोनं जगभरातल्या १९२ देशांसोबत करार आहेत. त्यात भारतही आहे. युनेस्कोच्या अंतर्गत येणाऱ्या गोष्टी आहेत त्यानंतर ती संस्था ठरवते त्याच्या बाजूला डेव्हलपमेंट होणार की नाही होणार. हजारो वर्ष जुन्या वास्तूंच्या बाजूला डेव्हलपमेंट करता येत नाही. आमच्याकडे जमिनी विकल्या, युनेस्को काय आहे हे माहितच नाही. उद्या त्यांनी सांगितलं की सरकारला करावंच लागेल. कातळ शिल्पांच्या बाजूला किलोमीटरचा बफर एरिया असतो, त्या ठिकाणी काही करता येत नाही, असं त्यांनी यावेळी नमूद केलं.
“तुम्हाला सतत अंधारात ठेवलं जातं. तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचू देत नाही, तुमच्या जमिनी हडपल्या जातात. जमिन घ्यायला कोणी आलं तर त्याला कशासाठी आलायस विचारा. जमिनी तुमची ठेवा, तिच जमिन तुम्हाला पैसे देईल. या निवडून आलेल्यांना घरी बसवा. तुमचा राग व्यक्त होऊ दे,” असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
अनेक प्रश्न प्रलंबित
आज कोकणात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते उभे राहण्याची कारणं तुम्ही आहात. तुम्ही त्याच त्याच व्यापारी लोकप्रतिनिधींना निवडून देऊन, पक्षाला निवडून दिलं, त्यांनी कोकणाचा व्यापार केला. तुम्ही तिकडेच आहात, असं ते यावेळी म्हणाले. २००७ ला सुरू झालेला मुंबई गोवा रस्ता अजूनही काही नाही. मधले पॅचेस झालेत. मी मागेही फडणवीसांना फोन केला. मला त्यांनी गडकरींशी बोलायला सांगितलं. त्यांना मी फोन केला. तेव्हा त्यांनी कॉन्ट्रॅक्टर पळून गेल्याचं सांगितलं. ज्यांना आजवर निवडून दिलं त्यांनी आजवर यावर काही विचारलं का? या लोकांना मतदानाशी संबंधित विषय आहे फक्त. तोच समृद्धी महामार्ग पाहा. सुरू पण झाला आणि तेही चार वर्षात. नागपूर ते शिर्डी आणि पुढचं काम सुरू आहे, आता गाड्या फिरतायत. १६ वर्ष आमचा रस्ता पूर्ण होत नसल्याचं खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.