कोविड लसीकरणाची मागणी वाढतेय, शहरात लसीकरणासाठी जागा बदलणार
चिपळूण : शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः अलर्ट झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्याबरोबरच तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढविला जाणार असून, शहरात दिवसातून २५० हून अधिक लसीकरण करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्याप्रमाणे, जिल्हा प्रशासनाकडे वाढीव लसीची मागणीही करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला तालुक्यात २०० ॲक्टिव्ह रुग्ण असल्याने, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीही उपाययोजना सुरू केल्या आहेत. आतापर्यंत १० हजार ९०३ जणांना लसीकरण पूर्ण झाले आहे.
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेग घेऊ लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी तालुका आणि चिपळूण तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असल्याची परिस्थिती दिसू लागली आहे. गेल्या वर्षीपेक्षा भयंकर वेगाने कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. प्रत्येक दिवशी २० हून अधिक नवीन रुग्ण सापडत असल्याने चिंता वाढली आहे. ही रुग्णसंख्या अशाच वेगाने वाढत राहिली, तर परिस्थिती बिकट होणार आहे. याची दक्षता घेत प्रशासनाने उपाययोजनेवर अधिक भर दिला आहे.
चिपळूण तालुक्यात आता २०० हुन अधिक ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कामथे शासकीय रुग्णालय, तसेच डेरवण आणि चिपळूणमधील दोन खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णावर उपचार सुरू असून, वेगाने वाढणारी रुग्णसंख्या पाहता, आवश्यक ते सर्व सोईसुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी आरोग्य यंत्रणाही तयार ठेवण्यात आली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती यादव स्वतः आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत आहेत. कोरोनाची साखळी आताच तोडणे आवश्यक असल्याने, त्यासाठी टेस्टिंग ट्रेसिंग आणि विलगीकरण आशा उपाययोजना वेगात सुरू करण्यात आले आहे.
चौकट
लसीकरण केंद्राचे होणार स्थलांतर
एका बाजूला कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना, दुसऱ्या बाजूला कोरोना प्रतिबंध लसीकरणालाही वेग देण्यात आला आहे. शहरात दररोज १५० लसीचे डोस उपलब्ध होतात. मात्र, हे डोस अवघ्या दोन तासांत संपत आहेत. त्यामुळे शहरी भागासाठी दररोज २५० लसीचे डोस उपलब्ध व्हावेत अशी मागणी करण्यात येत आहे. त्यानुसार येथील आरोग्य यंत्रणेने पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी एल टाईप शॉपिंग सेंटर येथे लसीकरण केंद्र स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती यादव यांनी दिली आहे.
चौकट
लसीकरण केंद्रावर येताहेत अडचणी
शहरातील पवन तलाव मैदान येथे लसीकरण केंद्र सुरू आहे. मात्र, येथे सतत वीज खंडित होणे व बैठक व्यवस्थेचा अभाव असे प्रश्न वेळोवेळी निर्माण होत आहे. शनिवारीही येथे विद्युत रोहित्र बिघडल्याने सुमारे दोन तास नागरिक ताटकळत उभे होते. यावेळी नगरपरिषद आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांनी तातडीने महावितरणशी संपर्क साधून नवीन विद्युत रोहित्र बसवून घेत वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला. त्यामुळे नवीन लसीकरण केंद्र सुरू करताना नगरपरिषदने जनरेटर व बैठक व्यवस्थेसह अन्य अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.