लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : येथील विशेष कारागृहात शिक्षा बंदीवर असलेल्या बंदीजनांसाठी गेल्या काही वर्षांपासून भाजीपाला लागवडीचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. परंतु, कोरोना काळात शासनाने बंदीजनांच्या दृष्टीने कोरोनाबाबतची खबरदारीची उपाययोजना म्हणून शिक्षेवर असलेल्या बंदीजनांना पॅरोलवर पाठविण्यात आल्याने सध्या केवळ न्यायाधीन शिक्षेवर असलेले बंदीच या कारागृहात आहेत. त्यामुळे सध्या भाजीपाला लागवड करण्यासाठी शिक्षाबंदी असलेले बंदीजन नसल्यानेच कारागृहात होणारी भाजीपाला लागवड बंद ठेवण्यात आली आहे.
रत्नागिरीचे तत्कालीन कारागृह अधीक्षक राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून २०१८ सालापासून जे बंदी साध्या शिक्षेवर आहेत, त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यास सुरूवात झाली होती. माठ, पालक, मिरच्या आदी विविध भाज्यांची तसेच शेतीची लागवड कारागृहाच्या सुमारे ७ एकर जागेत करण्यात येत होती. तसेच या आवारातील नारळ, फणस यातूनही उत्पन्न मिळत होते. यातून या बंदींची मजुरी काढून उर्वरित खर्च कारागृहासाठी केला जात असे. या भाज्यांची विक्री कारागृहाबाहेर करण्यात येत होती. सकाळी तीन तासातच या ताज्या भाज्या रत्नागिरीतील नागरिक खरेदी करत.
मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. राज्यात अनेक बंदी बाधित झाले. त्यामुळे शासनाने साध्या कैदींना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत पॅरोलवर सोडण्याचे आदेश ८ मे २०२० रोजी दिले. हे बंदी गेल्याने आता भाजीपाला उपक्रम सध्या बंद आहे.
विशेष बंदीजनांना सवलत नाही
विशेष बंदीजन ५०
पोक्सो किंवा महिलांविषयक गुन्ह्यातील बंदींना बाहेर सोडले जात नाही. त्याचप्रमाणे त्यांना पॅरोल रजा दिली जात नाही. येथील कारागृहात असे ५० बंदी आहेत. त्यांना सात वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरूंगवास झालेला आहे. त्यामुळे हे कैदी शिक्षा कालावधी पूर्ण होईपर्यंत कारागृहातच राहतात.
गंभीर गुन्ह्यातील १००
दरोडा, खून, हत्या आदी गंभीर गुन्ह्यातील बंदींना न्यायालयाकडून शिक्षा झालेली असते. त्यामुळे हे न्यायाधीन बंदी केवळ शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात दाखल केलेले असतात. त्यांच्यावर कारागृहाची केवळ निगराणी असते. मात्र, या कैद्यांना पॅरोल रजा मंजूर होत नाही.
पॅरोल नको रे बाबा
पॅरोल म्हणजे पळून जाणार नाही, किंवा ठरलेल्या वेळी परत येईन, असे बंदीने दिलेले अभिवचन. मात्र, काही वेळा बंदी हे अभिवचन न पाळता पळून जातात. त्यामुळे त्यांना शोधून पुन्हा आणण्यासाठी अनेक दिव्य करावे लागते. त्यामुळे पॅरोलवर सोडणे, ही जोखीमच असते.
ज्या बंदींना सात वषार्पेक्षा कमी शिक्षा झालेली असते. अशांना पॅरोल रजा घेते येते. बंदींचे वर्तन चांगले झाले तर त्यांच्या शिक्षेचा कालावधी कमी होतो. त्यांचे वर्तन सुधारावे, या हेतुने राज्यातील कारागृहात या बंदीकडून विविध कामे करून पुनर्वसन केले जाते. कोरोना संसर्ग वाढल्याने राज्य शासनाने साध्या बंदींना पॅरोलवर सोडले आहे. त्यामुळे सध्या कारागृह परिसरातील शेती बंंद आहे.
- अमेय पोतदार, सहायक कारागृह अधीक्षक, रत्नागिरी