लाेकमत न्यूज नेटवर्क
सचिन मोहिते/देवरुख : गेल्या काही महिन्यात संगमेश्वर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे. तालुक्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. मंगळवारी मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २७६ एवढी आहे. त्यातील लक्षणे नसलेले रुग्ण २३५ असून, तालुक्याचा रिकव्हरी रेट ९१.६२ एवढा आहे.
संगमेश्वर तालुका तसा डोंगरदऱ्यात वसलेला आहे. भौगोलिकदृष्ट्या तालुका विस्तीर्ण आहे. तालुक्यातील अनेकांचा संपर्क मोठ्या शहरांमध्ये आहे. परिणामी, डेल्टा प्लसचे १२ रुग्णही मिळून आले. त्यातील एक मृत झाला तर अन्य ११ बरे झाले आहेत. तालुक्यात मंगळवारपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६,५४३ एवढी झाली आहे. त्यातील एकूण ५,९९५ एवढे लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत २७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण २७६ असून, यातील २३५ हे लक्षणे नसलेले तर ४१ हे लक्षणे असलेले आहेत. तालुक्यात रुग्णसंख्या तशी स्थिरावली असून, रुग्णवाढीचा दर कमी झाल्याचे दिसून येत आहे तर रिकव्हरी रेट ९१.६२ टक्के आहे. सध्या गृहविलगीकरणात ११७ रुग्ण आहेत, तर १०१ रुग्ण उपचार घेत आहेत. जिथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत, तेथे सर्वच जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यावर भर दिला जात आहे. चाचण्या वाढविल्यामुळे तसेच लसीकरण मोहीम गतीने सुरू असल्याने रुग्णसंख्या कमी होत आहे. ही बाब तालुक्यासाठी दिलासादायक म्हणावी लागेल.