खेड : नागरिकांचे जगणे असह्य केलेल्या कोरोनाने हळूहळू तालुक्यातून काढता पाय घ्यायला सुरुवात केली आहे. गेले काही दिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी काहीअंशी कमी झाली आहे. तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून तब्बल ८३८ कंटेन्मेंट झोन कार्यान्वित करावे लागले होते. मात्र, आता ही संख्या ३५ वर आली आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. या लाटेचा परिणाम शहरी भागापेक्षा ग्रामीण भागावर जास्त झाला. तालुक्यातील सुमारे २०० गावांमध्ये कोरोना पसरल्याने अनेकांना याची झळ पोहोचली. ज्यांना वेळेत उपचार मिळाले ते या रोगातून वाचले. मात्र, ज्यांनी हा रोग अंगावर काढला किंवा त्यांना वेळेत उपचार मिळाले नाहीत त्यांना मात्र आपला जीव गमवावा लागला. ३० ते ४० या वयोगटातील काहीजणांचा गेलेला बळी अनेकांना चटका लावणारा होता. वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी तालुका प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. कंटेन्मेंट झोन ही त्यापैकीच एक उपाययोजना होती.
तालुका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात तब्बल ८३८ ठिकाणी कंटेन्मेंट करण्यात आले होते. त्यामुळे येथील ग्रामस्थांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले होते. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असल्याने कंटेन्मेंट झोन कमी होऊ लागले आहेत. सद्य:स्थितीत तालुक्यात ३५ कंटेन्मेंट झोन असून ॲक्टिव रुग्णांची संख्या २७४ इतकी आहे. त्यापैकी गृहअलगीकरणामध्ये १५८ रुग्ण उपचार घेत आहेत.
तालुक्यात एकूण ३२२९ जणांना कोरोनाची बाधा झालेली होती़ मात्र, ३४०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ज्या रुग्णांनी कोरोनावर मात केली त्यापैकी काहीजणांना म्युकरमायकोसिस या रोगाने पछाडले आहे. कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली असली तरी कोरोना अद्याप गेलेला नाही़ त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची आणि त्याचबरोबर दुसऱ्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शासनाने घालून दिलेले निर्बंध प्रत्येक नागरिकासाठी बंधनकारक आहेत. ते निर्बंध तोडू नयेत, अन्यथा कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.