लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शिमगोत्सव सुरू झाल्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सलग दोन दिवस ६० पेक्षा अधिक रुग्ण नोंदले गेले असून, मार्च महिन्याच्या २६ दिवसांत ६४३ रुग्ण नाेंदले गेले आहेत. प्रत्येक तालुक्यात ग्रामीण भागात रुग्ण आढळत असल्याने शिमगाेत्सवामुळेच रुग्ण वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी सुदैवाने मृतांची संख्या अजूनही आटोक्यात आहे. महिनाभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात आली असतानाच आराेग्य विभागाला अधिक दक्षता घ्यावी लागत आहे. राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचा फैलाव हाेत असतानाच कोविड लस देण्याचे प्रमाण तसेच काेरोना तपासणीही वाढविण्यात आली आहे.
जिल्हाभरात नोव्हेंबरनंतर कोरोनाबाधितांची संख्या कमी होती. मात्र, शिमगोत्सवामध्ये चाकरमानी गावी येणार असल्याने कोरोनाचा उद्रेक होणार असल्याचा अंदाज घेऊन आरोग्य विभागाने कोरोना तपासण्यांची संख्या वाढविली होती. आतापर्यंतच्या कोरोना तपासणीमध्ये २५ मार्च रोजी तपासणी केलेली संख्या १,७७७ ही सर्वांत जास्त हाेती. मार्च महिन्यामध्ये दररोज दुहेरी संख्येतच कोरोना रुग्ण सापडत आहेत. केवळ ८ आणि २३ मार्च रोजी कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याची संख्या एकेरीत होती. अपेक्षेप्रमाणे शिमगोत्सव सुरू झाल्यापासून रुग्णसंख्या वाढतच आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात ६० पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. होळीपर्यंत ही संख्या वाढतीच राहण्याची भीती आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी मृतांची संख्या मार्च महिन्यात कमी झाली आहे. फेब्रुवारीमध्ये मृतांची संख्या ३६५ होती. मार्च महिन्यात त्यात सहाजणांची भर पडल्याने ही संख्या ३७१ झाली आहे. दि. २ मार्च रोजी २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ ८, ९ व १० मार्च रोजी दररोज एक अशा ३ रुग्णांच्या मृत्यूनंतर १० दिवसांच्या कालावधीने दि. २० मार्च रोजी आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे या महिन्यात कोरोना रुग्णांच्या मृतांची संख्या कमी झाली आहे.
आजपर्यंत बाधित
१०,६१७
कोरोनामुक्त
९,८९९
एकूण मृत
३७१
.......................
शिक्षक पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आजही इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शाळा बंद आहेत. त्यापुढील वर्ग सुरू असले तरी एकाही शाळेतील विद्यार्थी कोरोनाबाधित आढळलेला नसल्याने ही जिल्ह्यासाठी सुखद बाब आहे. दोन दिवसांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणच्या एका माध्यमिक शाळेचा शिक्षक पॉझिटिव्ह आढळल्याने ही शाळा पुढील ३ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.