चिपळूण : तालुक्यात १५ दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. रविवारी एकाच दिवशी १४८ रुग्णांची भर पडल्याने येथील रुग्णांची संख्या १ हजार पाचवर पोहोचली आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेपुढे कोरोना केअर सेंटरसह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करताना समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे.
गेल्या महिनाभरात तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. त्यामुळे आता प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाली आहे. कामथे उपजिल्हा रुग्णालयातील बेड फुल्ल झाले आहेत. तर शासकीय आणि खासगी कोविड सेंटरमध्येही ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत. त्यातच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. आवश्यक इंजेक्शन उपलब्ध होताना दिसत नाहीत. कोरोनाची लसही संपली आहे. अशा अनेक अडचणी प्रशासनापुढे असताना दुसरीकडे मात्र रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या तालुक्यात १,१०५ जण कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील नागरी आरोग्य केंद्र चिपळूण येथे २५८, सावर्डे २६१, अडरे ११३, फुरूस ८८, शिरगाव ५५, वहाळ ३६, रामपूर ४१, दादर ४१, खरवते ५१, कापरे २०, तर जिल्हा बाहेरील ४१ जणांवर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत तालुक्यातील ४,२८४ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील ३,१५३ जण बरे झाले आहेत. तर १२६ जणांचा बळी गेला आहे. शनिवारी एका दिवसात तब्बल १७९ रुग्ण सापडले असतानाच रविवारी १४८ रुग्ण आढळले आहेत. असे असताना आजही अनेक जण विनाकारण बाजारपेठेत फिरत असून मास्कही लावत नसल्याचे दिसूत येत आहे. काही व्यावसायिक लॉकडाऊन असतानाही आपल्याला प्रशासन काहीही करीत नाही म्हणून छुप्या पद्धतीने व्यवसाय करत आहेत. एखादे दुकान उघडे राहत असल्याने साहजिकच त्यांच्याकडे खरेदीसाठी गर्दी होत आहे.