खेड : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या अनुषंगाने कोकण रेल्वेतून प्रवास केल्यानंतर हातावर १४ दिवसांचा क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे. त्यामुळे आता कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होऊ लागली आहे. सध्या रेल्वे स्थानकांवर तपासणीचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.
मानधनाची प्रतीक्षा
रत्नागिरी : ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार अधिक वेगाने व्हावा यासाठी कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांचे मानधन पुन्हा रखडले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना मानधन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
माठ विक्रीला
गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथे सध्या माठ मोठ्या प्रमाणावर विक्रीला आले आहेत. राजस्थान येथून आलेले हे माठ सध्या उकाडा वाढू लागल्याने चांगल्याप्रकारे खरेदी केले जात आहेत. गरिबांचा फ्रिज म्हणून मातीच्या माठांची ओळख आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत माठाला मागणी वाढली आहे.
शाळाबाह्य विद्यार्थी
रत्नागिरी : सहा तालुक्यांमधील शाळाबाह्य ९० विद्यार्थी पुन्हा शैक्षणिक प्रवाहात दाखल झाले आहेत. शाळाबाह्य अनियमित स्थलांतरित विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची मोहीम जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. त्यानुसार गुहागर, खेड, लांजा वगळता अन्य सहा तालुक्यांतील ९० विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात दाखल झाले आहेत.
धरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत
दापोली : येथील पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत असलेल्या धरणांच्या कामांना अद्याप वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी मिळालेली नाही. तालुक्यातील सुकोंडी, रेवली, पावनळ, ताडील आणि जामगे या धरणांमध्ये कामे रखडली आहेत. याचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडेही पाठविण्यात आले आहेत.
ग्रामपंचायतीचा पुढाकार
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील लोवले ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात कोरोनाला रोखण्यासाठी विविध स्तरावर पुढाकार घेतला आहे. येथील ग्राम कृती दल पुन्हा सक्रिय बनले आहे. वाडीनिहाय निर्जंतुकीकरणाची मोहीम राबविण्यात आली आहे. या सर्व उपक्रमांना ग्रामस्थांमधून उत्तम सहकार्य मिळत आहे.
अवकाळी पाऊस
चिपळूण : तालुक्यातील पूर्व विभागाला बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढले. विजांचा कडकडाट तसेच वारा आणि पाऊस यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अलोरे, शिरगाव, पोफळी, कोळकेवाडी परिसरात जोरदार पाऊस पडल्याने, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा गारवा मिळाला.
धुळीचे साम्राज्य
सावर्डे : सावर्डे ते आरवलीदरम्यान मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत आगवे येथील वळणावर मोरीचे काम करण्यासाठी दुसरा वळणाचा रस्ता काढण्यात आला आहे. मात्र हा रस्ता कच्चा आहे. यावरून अवजड वाहने गेल्यावर धुळीचे लोट उठत आहेत. या धुळीचा त्रास वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे.
बचत गट चळवळीला फटका
रत्नागिरी : कोरोनाचा फटका बचत गटांना बसला आहे. शासनाकडून वेळेवर निधी न आल्याने बचत गटांचे काम थांबणार आहे. जिल्ह्याला सात कोटींची गरज असताना केवळ चार कोटी एवढाच निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या महिला बचत गटांना साडेतीन कोटी रुपयांच्या खेळत्या भांडवलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
विजेचा लपंडाव कायम
आवाशी : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. उष्म्याने नागरिक हैराण बनले असतानाच खेड खाडीपट्ट्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसातून अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढल्याने अनेक व्यवसायांवर परिणाम होऊ लागला आहे.