मंडणगड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मंडणगड तालुक्यासाठी चिंता वाढत आहे. कोरोनाला वर्षभरात नियंत्रणात ठेवणाऱ्या मंडणगड तालुक्यात एका महिन्यात ३७ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना वाढत असताना मंडणगड तालुका अन्य तालुक्यांच्या तुलनेने कमी असला तरी गतवर्षीचा कोरोना रुग्णांचा आकडा पाहता दुसऱ्या लाटेमध्ये मंडणगड तालुक्यातही कोरोना रुग्ण सापडण्याचा आकडा चिंताजनक आहे.
गतवर्षी मार्च ते फेब्रुवारी २०२१ या वर्षभरात संपूर्ण तालुक्यात केवळ १५३ रुग्ण सापडले होते, यामध्ये केवळ ४ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. बाकी सर्वांनी कोरोनावर मात केली होती. तालुक्यातील १०९ गावांपैकी केवळ ३० गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता, तर ७९ गावांनी कोरोनाला गावच्या वेशीबाहेरच रोखले होते. ही बाब तालुक्याला अभिमानास्पद होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मंडणगड तालुक्यात शिरकाव केला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडा ते ५ एप्रिलपर्यंत १७ गावांमध्ये ३७ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ११ बरे झाले असून २६ अॅक्टिव्ह आहेत. गतवर्षाचा आकडा आणि दुसऱ्या लाटेचा तालुक्यातील रुग्णांचा आकडा पाहता तालुक्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. याचबरोबर तालुक्यात लसीकरणाचा आकडाही अत्यल्प आहे. तालुक्यात ज्येष्ठ नागरिकांचा टक्का अधिक आहे. तरुण वर्ग रोजगारानिमित्त शहरात आहे तर वयोवृद्ध नागरिक गावी आहेत. त्यांचा लसीकरणाचा आकडाही फार कमी आहे. तालुक्यात ४५ वर्षांवरील लोकांची संख्या १५४७६ एवढी आहे, यापैकी केवळ ४७६ लोकांनी लस घेतली आहे.
तालुक्यातील निम्याहून अधिक लोकांनी अजूनही लस घेतलेली नाही. गतवर्षी संपूर्ण जिल्ह्यात सर्वप्रथम मंडणगड तालुक्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, यानंतर हे प्रमाण अत्यल्प झाले आणि जिल्ह्यात सर्वात कमी रुग्ण तालुक्यात अशी स्थिती होती. मात्र, यावर्षीच्या रुग्णसंख्येचा विचार करता ती तालुक्यासाठी चिंताजनक आहे.
मंडणगड प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी संख्या
वैद्यकीय अधिकारी मंजूर ६, उपलब्ध ६, आरोग्य सहायक मंजूर ६, उपलब्ध ५, आरोग्य सहायिका मंजूर ३, उपलब्ध २, आरोग्यसेवक मंजूर २०, उपलब्ध ११, आरोग्यसेविका मंजूर २५, उपलब्ध २३, परिचर मंजूर १२, उपलब्ध ६, फार्मासिस्ट मंजूर ३, उपलब्ध ३, लिपिक मंजूर ३, उपलब्ध ३.