भातशेतीमध्ये लागवडीसंबंधी प्रामुख्याने दोन भाग पडतात. त्यातील पहिला म्हणजे रोपवाटिकेत रोपे तयार करून त्याची पुनर्लागण करणे आणि दुसरा पेरभात लागवड होय. अति पावसाच्या भागात पहिल्या, तर कमी पर्जन्यमानाच्या विभागात दुसऱ्या पध्दतीचा अवलंब केला जातो. पुनर्लागण पध्दतीत प्रतिहेक्टरी रोपांची संख्या योग्य राखल्याने तसेच पिकाची जाेमदार वाढ झाल्याने उत्पन्न जास्त मिळते. त्यामुळे बहुतांश शेतकरी भाताची लागवड पुनर्लागण पध्दतीने करतात. त्यासाठी रोपवाटिकेत रोपे तयार करण्याची आवश्यकता असते. स्थानिक परिस्थिती, हवामानातील घटक, पावसाचा लहरीपणा, आर्थिक बाब इत्यादी गोष्टी विचारात घेऊन रोपे तयार करण्याच्या वेगवेगळ्या पध्दतींचा अवलंब केला जातो.
कोकणामध्ये भाताची लागवड मुख्यत: खरीप हंगामात केली जाते. त्यामध्ये हळव्या, निमगरव्या तसेच पाणथळ ठिकाणी गरव्या जातीची लागवड केली जाते. भाताची लागवड रोपे तयार करून केली जाते. भाताची निरोगी व सुदृढ रोपे ही पिकाच्या अधिक उत्पादनाची गुरूकिल्ली आहे. एकूण भात उत्पादनाचा पाया असलेल्या भात रोपवाटिकेचे व्यवस्थापन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करूनच केले पाहिजे. भाताच्या चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या रोपांची आवश्यकता असते. त्यासाठी रोपवाटिकेपासून व्यवस्थापन केल्यास निरोगी रोपांची उपलब्धता होते. यासाठी गादी वाफा व रहू पध्दतीने रोपनिर्मिती करता येते.
जागेची निवड व पूर्वतयारी
भात रोपवाटिका तयार करण्यासाठी जमिनीचा उतार लक्षात घेऊन उंच ठिकाणी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. अगोदरच्या पिकाची कापणी होताच शेताची नांगरणी करावी आणि शेत उन्हाळ्यात तापू द्यावे. सुरुवातीचा पाऊस पडल्यानंतर पुन्हा रोपवाटिकेचे क्षेत्र दोन वेळा उभे आडवे नांगरून ढेकळे फोडून भुसफुशीत करावे. उगवलेल्या तणांचा नायनाट करावा. प्रतिगुंठा क्षेत्रास अर्धा टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळून घ्यावे. त्याचबरोबर तुसाची राख मिसळावी.
निरोगी रोपे
भात रोपवाटिकेत वाढणारी रोपे तुसाच्या राखेतील सिलीकाॅन आणि पालाश यांचे शोषण करून घेऊन ती कणखर व निरोगी बनून त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशी रोपे शोषण करून घेऊन ती कणखर व निरोगी बनून त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ही रोपे लावणीसाठी वापरल्यास भरपूर मुळे फुटतात.
रोपवाटिकेचे प्रकार
भाताच्या रोपवाटिकेसाठी गादीवाफा, सपाट वाफा, ओटे करून, रहू पध्दतीने, दापोग तसेच चटई पध्दतीने (मॅट) रोपांची निर्मिती करून पुनर्लागण करू शकतो. परंतु कोकणामध्ये अति पर्जन्यमानाच्या ठिकाणी गादी वाफा पध्दत अति फायदेशीर आहे. शेतकरी फायदेशीर पध्दतीची निवड रोपवाटिकेसाठी करीत आहेत.