रत्नागिरी : सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी बुधवारी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने तशी सूचना दिली असून, जिल्हा प्रशासनाने सर्वत्र सावधानतेचा इशारा दिला आहे.
गत महिन्यात २२ व २३ रोजी अतिवृष्टीने रत्नागिरी जिल्ह्याला चांगलेच झाेडपून काढले. त्यात चिपळूण आणि खेड या दाेन ठिकाणी महापुरामुळे खूप मोठे नुकसान झाले. त्यानंतर पावसाचा जोर ओसरला आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर चांगलाच कमी झाला होता. केवळ छोट्या मोठ्या सरी कोसळत होत्या. आता कुलाबा वेधशाळेने काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या संदेशानुसार १७ व १८ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यात मंगळवारी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या असल्या तरी त्यात सातत्य नव्हते. बुधवारीही तशाच पावसाची शक्यता आहे.