मुंबई - गोवा महामार्गावर इंदापूर (रायगड) ते झाराप (सिंधुदुर्ग) या ३६६ किलोमीटरच्या चौपदरीकरणासाठी आतापर्यंत काढलेले सर्वच मुहूर्त फोल ठरले. याउलट महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणजेच ‘मुंबई ते नागपूर’ रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. २०२१ अखेर हाच प्रकल्प शिर्डी ते नागपूरपर्यंत पूर्ण होईल. एकीकडे शासन ७०१ किलोमीटर क्षेत्राचा मुंबई - नागपूरसारखा प्रकल्प पूर्ण करत आहे. परंतु, मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम समान वेगाने करताना दिसत नाही. कोकण प्रदेशाविरूद्ध हा गंभीर भेदभाव आहे! एवढेच नव्हे तर कोकणाला बदनाम करण्यासाठी आणि पर्यटकांना बेंगलोर महामार्गाने वळविण्यासाठी हे एक षडयंत्र असल्याची शंका आता उघडपणे उपस्थित केली जात आहे. यातून व्यावसायिकांचे तसेच हॉटेल व पर्यटनाशी संबंधित क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. अर्थात याआधी महामार्ग प्रश्नी खासदार विनायक राऊत व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अनेकवेळा आवाज उठवला. तरी अजूनही या कामात अपेक्षित प्रगती नाही. उलट महामार्गावरील खड्डे व दरडींचा धोका कायम आहे. अशा परिस्थितीत नेतेमंडळींनीही केवळ पत्र पाठवून कागदी घोडे नाचविण्यापेक्षा थेट मुद्द्याला हात घालण्याची गरज आहे. एकूणच राजकीय पुढारी व अधिकारी केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत असतील, तर २०२२ नव्हे त्याही पुढचा मुहूर्त काढण्याची तयारी आतापासूनच ठेवायला हवी. आता तर गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. चाकरमान्यांना तर त्याचे आतापासूनच वेध लागले आहेत. परंतु, यावर्षीही त्यांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे. उलट भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे आणखी जोरदार धक्के बसणार आहेत. तेव्हा महामार्ग प्रश्नी राजकारण करु पाहणाऱ्यांनी व या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांनी आता तरी थांबायला हवे. अन्यथा जनता राजकीय अडथळे निर्माण करणाऱ्यांनाच राजकीय प्रवाहातून दूर लोटल्याशिवाय राहणार नाही, हेही तितकेच खरे आहे.
महामार्गाच्या कामात अडथळेच अडथळे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:35 AM