रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ५६४ गावांमध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले असून ४४ गावांमधील १३४ सनद जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाकडे प्राप्त झाल्या असून त्याचे वितरणही करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या ४४ गावांमधील गावठाणांमध्ये वर्षानुवर्षे वास्तव्य करून राहणाऱ्या भोगवटादारांना त्यांचे हक्काचे घर मिळाले असून प्रत्येकाला आपापल्या मालकीचा अचूक अधिकार अभिलेख मिळाला आहे.शासनाने २०१९ साली गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ५६४ गावे यासाठी निश्चित करण्यात आली. या गावांमध्ये भूमिअभिलेख विभागाकडून ड्रोनफ्लायद्वारे सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत या गावांपैकी ३५० गावांचे ड्रोनफ्लाय पूर्ण झाले असून चाैकशी सुरू आहे. तर १३४ सनदांचे वाटप ४४ गावांमध्ये करण्यात आले. त्यामुळे या ४४ गावांमधील १३४ जणांना त्यांच्या नावाची मालमत्तापत्रिका (प्राॅपर्टी कार्ड) मिळाल्याने त्यांना त्यांच्या मालकीचे घर मिळाले आहे. या सनद वितरणातून जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयालाही १२ लाखांचे सनद शुल्क मिळाले आहे.५६४ गावांपैकी ३५० गावांमध्येही आता चाैकशी पूर्ण होत आली असून या गावठाणातील रहिवाशांची मालमत्ता प्राॅपर्टी कार्ड आणि सनद मिळण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरच या गावठाणांमधील भोगवटादारांनाही त्यांच्या घराची मालकी मिळण्यास मदत होणार आहे. नोव्हेंबर २०२३ पर्यंत या सर्व ५६४ गावठाणांमधील भाेगवटादारांना प्राॅपर्टी कार्ड आणि सनद देण्याचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने भूमिअभिलेख कार्यालयाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
९३० गावांमध्येही गावठाणे घोषित होणारड्रोनफ्लाय झालेली ६४ गावे आणि त्याआधीची भूनगरमापन झालेली ६३ गावे धरून एकूण ६२७ गावांचे सर्वेक्षण झालेले आहे. जिल्ह्यात एकूण १,५५७ महसूल गावे आहेत. त्यापैकी मोजणी झालेल्या ६२७ गावांना वगळता अजूनही ९३० गावे शिल्लक आहेत. या गावांमध्येही गावठाण घोषित करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे ही गावठाणे घोषित झाल्यानंतर या गावांमध्येही ड्रोनफ्लायद्वारे सर्वेक्षणाचे काम भूमिअभिलेख कार्यालयाकडून हाती घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ५६४ गावांमध्ये ड्राेनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ४४ गावांमध्ये १३४ सनदांचे वितरण करण्यात आले आहे. ३५० गावांमध्ये चाैकशी सुरू आहे. लवकरच या गावांच्या सनदाही प्राप्त झाल्यानंतर त्यांचे वितरण करण्यात येईल. - एन.एन. पटेल, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख, रत्नागिरी
....तालुका गावठाणे चाैकशी पूर्ण सनद प्राप्तमंडणगड १०५ ९२ ४२ दापोली १३३ ६३ २०खेड १६६ ७० --चिपळूण ८१ ५९ ३६गुहागर ३९ ३३ २१रत्नागिरी २३ २१ ९संगमेश्वर १५ १० ४लांजा २ २ २एकूण ५६४ ३५० ९३०