रत्नागिरी : शासनाकडून महिलांना कोणतीही मदत अथवा सानुग्रह अनुदान दिले जात नाही. कुटुंबाचे आर्थिक नियोजन सांभाळणाऱ्या, स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बहिणींना शासनाकडून बक्षीस दिले जात आहे. काही दिवसातच आचारसंहिता लागेल त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे पैसे येत्या ९ तारखेलाच खात्यावर जमा होतील, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे दिले.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत साेमवारी शहरातील कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे महिला सशक्तीकरण व सक्षमीकरण मार्गदर्शक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंत्री सामंत बाेलत हाेते. यावेळी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी श्रीकांत हावळे, मुख्याधिकारी तुषार बाबर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव उपस्थित होते.
मंत्री सामंत पुढे म्हणाले की, विरोधक ही योजना बंद होण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वाेच्च न्यायालयात गेले परंतु दोन्ही ठिकाणी आमच्या बाजूने निकाल लागला. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांना धडा शिकवण्याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, सीआरपी, महिला व बाल कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मंत्री सामंत यांनी अभिनंदन केले.शासनातर्फे लेक लाडकी योजना, वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातून दि. १३ ऑक्टोबरपर्यंत एक तरी गाडी जायला हवी, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले. यावेळी शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थी महिलांचा मंत्री सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पंधराशेचे दोन हजार करूकितीही अडचणी आल्या तरी योजना बंद पडणार नाही. ती सुरू राहणारच ! उलट पंधराशेचे २ हजार करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो, असे मंत्री सामंत म्हणाले.