चिपळूण : येथील काँग्रेसमधील गटबाजी व अंतर्गत धुसफूसबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रारी गेल्या आहेत. याविषयी जिल्हा कॉंग्रेस प्रभारी मनोज शिंदे हे लवकरच बैठक घेणार असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात या बैठकीविषयी काँग्रेसचे पदाधिकारीच अनभिज्ञ असल्याची बाब समाेर आली आहे.
सध्याच्या स्थितीला येथील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये सातत्याने धुसफूस सुरू आहे. कोरोनाच्या कालावधीतही काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर एकमेकांविरोधात तक्रारीसुद्धा करण्यात आल्या आहेत. याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रारी गेल्या आहेत. त्यांनी रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस प्रभारी मनोज शिंदे यांना या विषयाकडे लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना केल्या आहेत.
येथील काँग्रेसमध्ये नेहमीच दोन गट राहिले आहेत. पक्षात दाखल होणारे नवे पदाधिकारी आणि जुन्यांचे फारसे पटलेले नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे काँग्रेसमध्ये असतानाही हीच स्थिती होती. नव्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात नेहमीच तक्रारीचा सूर उमटला आहे. त्यामुळे शहरातील पाच नगरसेवक वगळता तालुक्यात काँग्रेसला ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत फारसे यश मिळालेले नाही. त्यामुळेच नेहमी तक्रारींचा सिलसिला सुरू राहिला आहे. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रभारी मनोज शिंदे हे चिपळुणातील गटबाजीवर बैठक घेणार आहेत, असे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. प्रत्यक्षात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी या बैठकीविषयी अनभिज्ञ आहेत.
-----------------------------
साेशल मीडियावरील बैठकीची दखल
काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी काेणतीच बैठक ठरविण्यात आलेली नाही़ तरीही बैठकीबाबत साेशल मीडियावर मेसेज टाकून संभ्रम निर्माण करण्यात आला. या मेसेजनंतर पक्षाने त्याची गंभीर दखल घेतली आहे़ साेशल मीडियावर पाेस्ट टाकणाऱ्याचा शाेध आता काॅंग्रेसचे पदाधिकारी घेत आहेत.
--------------------------
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून, तो पक्षाच्या घटनेनुसार व शिस्तीने चालतो. त्यामुळे परस्पर सोशल मीडियावरून कोणी काय म्हटले तर त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. अजून तरी पक्षाच्या बैठकीविषयी कोणताही निर्णय झालेला नाही किंवा तसे कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून उठाठेव करणाऱ्यांकडे कार्यकर्त्यांनी लक्ष देऊ नये.
- भरत लब्धे, माजी तालुकाध्यक्ष, काँग्रेस, चिपळूण.