आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी, दि. १५ : वृध्द ग्राहकाच्या बँक खात्यात दोन दिवसात तब्बल आठ वेळा व्यवहार करून हजारो रुपयांची फसवणूक केल्याची घटना मारूती मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी कोटक महिद्रा बँकेच्या शाखाधिकाऱ्याविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनय श्रीधर गोगटे (५२, उत्कर्षनगर, कुवारबाव) यांचे मारूती मंदिर परिसरातील कोटक महिद्रा बँकेमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून बचत खाते आहे. या खात्यातून त्यांची देवाणघेवाण सुरू होती. २ ते ३ जुलै या कालावधीत बँकेने विनय गोगटे याच्या खात्यावरून एकूण आठ वेळा व्यवहार करून सुमारे २४ हजार ६२३ रुपयांची फसवणूक केली. याबाबत विनय गोगटे यांनी बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशीही केली. त्यावेळी बँक अधिकाऱ्यांनी तुमचे पैसे लवकरात लवकर परत देऊ, असा विश्वास दिला. परंतु या घटनेला आज दहा दिवस उलटून गेले तरी बँकेने त्यांचे पैसे अद्याप दिले नाहीत.
आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे विनय गोगटे यांनी तत्काळ शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बँक शाखाधिकारी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.