रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ अंतर्गत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये रत्नागिरीतील ६१ शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. या संपामुळे महाविद्यालयाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.झोपचं सोंग घेऊन आपणाला संघर्ष करण्यास भाग पाडणाऱ्या शासनाला धडा शिकविण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. दि.७ डिसेंबर १८ व दि १६ फेब्रुवारी २०१९चा अन्यायकारक कर्मचारी विरोधी शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. हा निर्णय रद्द न झाल्यास सर्वांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नेते डॉ. आर.बी सिंह सर यांच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला आहे. रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील कर्मचारीदेखील या संपात सहभागी झाले आहेत.
महाविद्यालय युनिट प्रमुख आणि पदाधिकारी यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. तसेच घोषणा दिल्या. हा संप शासनाने आपल्यावर लादला असून, शासनाच्या जुलमी, अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्यासाठी हा संप करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.